श्री बांदेश्वर मंदिरात नवीन पालखी अर्पण सोहळा उत्साहात…

⚡बांदा ता.२३-: बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात नवीन पालखीचा अर्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी ब्राह्मण वृंदाच्या मंत्रोच्चारात पालखीचे पूजन, मंत्र पठण, हवन, अभिषेक,शुद्धीकरण आदींसह विविध धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर आरती होऊन गाऱ्हाणे घालण्यात आले आणि भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले.
नारळी पौर्णिमा, विजयादशमी, जत्रोत्सव, महाशिवरात्री सोहळा ,श्रीरामनवमी आदी सणांना श्रींची पालखी निघते. तसेच जत्रोत्सवापासून मृग नक्षत्रापर्यंत दर सोमवारी श्री बांदेश्वराचा पालखी सोहळा सुरू असतो. श्री बांदेश्वराचा पालखी सोहळा हा सर्व बांदेश्वर भक्तांसाठी मोठ्या आनंदाचा आणि भक्तिचा सोहळा असतो. या सोहळ्याला भाविक नित्यनेमाने मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
या नवीन पालखीसाठी लागणारे लाकूड सामान उद्योजक आनंद गवस यांनी दिले असून प्रवीण मेस्त्री, आत्माराम फर्निचर यांच्याकडे पालखीचे काम करण्यात आले आहे. पालखी अर्पण सोहळ्याच्या वेळी उद्योजक आनंद गवस यांना प्रसादाचे श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.ही नवीन पालखी सोमवार दिनांक 24 पासून श्रींच्या सेवेत रुजू होणार असून महाशिवरात्री सोहळ्याला श्रींची स्वारी नवीन पालखीतून निघेल.

You cannot copy content of this page