काव्यवाचन स्पर्धेत कळसुलीचे श्रेयस शिदे प्रथम…

वेंगुर्ला प्रतिनिधी – नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेने आयोजित केलेल्या कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती काव्य वाचन स्पर्धेत कळसुली येथील श्रेयस शिदे (एक झोका) यांनी प्रथम, तुळस येथील अजित राऊळ (मास्तराची श्रीमंती) यांनी द्वितीय तर कसाल येथील रसिका तेंडोलकर (लक्षाण) आणि आचरा येथील अनुराधा आचरेकर (बाबा) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

  या स्पर्धेसाठी नगर वाचनालय संस्थेने जिल्ह्यातून कविता मागविल्या होत्या. त्यातील निवडक २० कवींना आपल्या कविता सादर करण्यासाठी बोलविण्यात आले होते. स्पर्धेचे परिक्षण वीरधवल परब व डॉ.शरयू आसोलकर यांनी केले. संस्थेचे कार्यवाह अनिल सौदागर यांनी आपली काकी तसेच पद्मभूषण कवी मंगेश पाडगांवकर यांची सख्खी बहिण कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर यांच्या स्मरणार्थ भविष्यात ही काव्यवाचन स्पर्धा घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा निधी संस्थेकडे दिला आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी आलेल्या कवितांपैकी निवडुक ३० कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

  कवितेत वेगळेपण केल्याने कविता टिकून राहिली. उद्याच्या कवीचा जन्म अशा स्पर्धेतूनच होत असल्याचे शरयू आसोलकर म्हणाल्या. काव्यवाचन स्पर्धा हे नगर वाचनालय संस्थेचे वेगळेपण आहे. असे कार्यक्रम सतत आयोजित केले पाहिजेत, असे आवाहन वीरधवल परब यांनी केले.

  या कार्यक्रमाला संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, सदस्य दीपराज बिजीतकर यांच्यासह नाना कांबळी, प्रा.धीरज पाचपिले, प्रा.राम चव्हाण, मुख्याध्यापक जाधव, प्रा.मोहिते आणि वाचक, सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार, सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी तर कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आभार मानले.

फोटोओळी * काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page