चौके येथील अपघातात नंदकुमार राणे यांचे दुर्दैवी निधन..
⚡मालवण ता.१२-: चिमुकल्या बाळाच्या अंत्यविधिसाठी दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीने धडक दिल्याने चौके स्मशानभूमीजवळ आज सकाळच्या सुमारास घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौके थळकरवाडी बाजारपेठ येथील किराणा व्यापारी आणि आदर्श व्यापारी संघ चौकेचे अध्यक्ष नंदकुमार हिरोजी राणे (वय ५४) यांचे उपचार सुरु असतानाच निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच संपूर्ण चौके गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
या संबंधीचे अधिक वृत्त असे की चौके थळकरवाडी बाजारपेठ येथील किराणा व्यापारी नंदकुमार राणे हे आपले आई वडील, पत्नी मुलांसह राहतात. आज मंगळवारी चौके कुळकरवाडी येथील किरण गावडे यांच्या तीन वर्षाच्या मुलाचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. या छोट्या मुलाच्या अंत्यविधीसाठी नंदकुमार राणे हे चौके स्मशानभूमीकडे दुचाकीवरून डबलसीट जात असताना स्मशानभूमी जवळच रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली या धडकेमुळे नंदू राणे यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठया प्रमाणात रक्तत्राव झाला. त्यांना तात्काळ चौके ग्रामीण रुग्णालयात नेत प्राथमिक उपचार करत रुग्णवाहिकेने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. श्री राणे यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश आले नाही.
नंदू हाच राणे कुटुंबातील कर्ता कमवता होता. चांगले शिक्षण घेऊनही नोकरी न करता वडिलोपार्जित किराणा दुकानाचा व्यवसाय तसेच शेती करत असायचा. नंदू यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राणे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पच्छात वृद्ध वडील, पत्नी दोन मुली, एक मुलगा विवाहित बहिणी- भावोजी, मुंबईस्थीत काका काकी, चुलत भाऊ आसा परिवार आहे.
नंदू राणे यांच्या अकाली निधनाची बातमी समजतात चौके गावासाह संपूर्ण चौके पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. नंदू राणे यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता चौके येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत .
चौकड वापरा
छोट्या बालकाचा मृत्यू आणि नंदू राणे यांच्या अपघाती निधनाने चौके गाव हळहळला..
मंगळवारची सकाळ संपूर्ण चौके गावाला वेदनादायक ठरली. सकाळीच चौके कुळकरवाडी येथील तीन वर्षाचा शौनक किरण गावडे या गावडे परिवारसाठी जीव की प्राण असलेल्या छोट्या मुलाचा एक दिवसाच्या किरकोळ आजारातून मालवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. ही घटना समजताच गावातील सर्वांनीच कुळकरवाडी येथील दिगंबर गावडे यांच्या घरी धाव घेत गावडे कुटुंबाला धीर दिला. यानंतर दुःखद वातावरणात बालकाच्या अंत्याविधीसाठी जात असताना अपघात घडून त्यात नंदकुमार राणे यांचे दुर्दैवी निधन झाले. कुमार शौनक यांच्या पश्चात आई वडील भाऊ, काका काकी आजोबा, आते असा परिवार आहे.
एका आघातानंतर लगेच दुसऱ्या आघाताने चौके गाव मंगळवारी दिवसभर हळहळला. बाजारपेठ बंद ठेऊन दोघांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
