“तरुणपण हरवले महाराज” मधून मांडले तरुणाईचे प्रश्न:मुंबई विद्यापीठ उड्डाण महोत्सव – २०२५ मध्ये १७ महाविद्यालये सहभागी..
कुडाळ : सावंतवाडी येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उड्डाण महोत्सवात संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या “तरुणपण हरवले महाराज” या पथनाट्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. आधुनिक जगात आजच्या तरुणाईला अनेकविध समस्यांनी ग्रासलेले आहे. बेरोजगारी, मानसिक अस्वास्थ्य, नातेसंबंधामध्ये वाढत चाललेला दुरावा आणि यामुळे पराक्रम दाखवण्याच्या वयात युवक जगण्यासाठीची धडपड करताना दिसतो आहे. यासाठी युवकांमधील नैराश्य दूर होऊन खर्या तरुणपणाची जाणिव या पथनाट्यातून करून देण्यात आली. तसेच भित्तिचित्र रेखाटन स्पर्धेत आधुनिक समाज्यातील जगण्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर रेखाटलेल्या भित्तिचित्र रेखाटनाला ब्रांझ मेडल (तृतीय क्रमांकाचे पारितोषिक) प्राप्त झाले.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा, जिल्हास्तरीय सांस्कृतिक ‘उड्डान महोत्सव -२०२५” बुधवार, दि. ५ फेब्रुवारी, २०२५ रोजी देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, सावंतवाडी या ठिकाणी संपन्न झाला. या महोस्तवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण १७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
या महोत्सवात पथनाट्य, भित्तिचित्र रेखाटन, सृजनशील लेखन आणि वक्तृत्व आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने सादर केलेल्या “तरुणपण हरवले महाराज” या पथनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. या पथनाट्यामध्ये सानिका कुंटे, वैष्णवी धामापूरकर, निनाद राऊळ, आदर्श गाईकवाड, तनिश तेली, समृद्धी बोभाटे, अवधूत आचरेकर, चैतन्य सातार्डेकर, पूजा प्रभू, निवेदिता मेस्त्री, तन्वी आंदुर्लेकर, आणि सोनाली दावदाते या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच भित्तिचित्र रेखाटन या स्पर्धेत सोनिया परब, सृजनशील लेखन, धनश्री मुंज आणि वक्तृत्व स्पर्धेत हुमेरा मुकादम हिने सहभाग घेतला होता. तसेच श्रुती रामचंद्र मळगावकर आणि राखी सामंत या विद्यार्थ्यांनी उपक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन पाहिले.
या सर्व सहभागी आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे क. म. शि. प्र. मंडळाचे पधाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे मॅडम यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना DLLE विभागाचे समन्वयक डॉ. डी. जी. चव्हाण, यांचे मार्गदर्शन लाभले.
