कुडाळवासियांच्या वतीने होणार हृद्य सत्कार:सत्कार समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर यांची माहिती..
कुडाळ : डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर. वालावल गावचे सुपुत्र आणि कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉ. प्रमोद वालावलकर यांची आहे. म्हणूनच त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन कुडाळ शहरवासीय व राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बॅरिस्टर नाथपयी शैक्षणिक संकुल एमआयडीसी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय डॉक्टर वालावलकर प्रेमींनी घेतला आहे. अशी माहिती समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर यांनी दिली. साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाट यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे असे श्रीमती परुळेकर यांनी सांगितले त्या आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
कुडाळ शहरवासीय व डॉक्टर वालावलकर यांच्या चाहत्यांची बैठक आज मराठा समाज हॉलमध्ये झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. डॉक्टर वालावलकर हे राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढले. कुडाळसह संपूर्ण तालुका व परिसरातील रुग्णांसाठी डॉक्टर वालावलकर यांनी चांगली सेवा दिली. ते सर्वांमध्ये लोकप्रिय ठरले, म्हणून आम्ही त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर वालावलकर यांना सत्कार केलेला आवडणार नाही म्हणून त्यांचे विचार ऐकण्यासाठी विचार मंथन करावे असा विचार पुढे आला व तशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरी सत्कारासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे. 16 रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळात हा नागरी सत्कार होणार आहे, असे कमलताई परुळेकर यान सांगितले.
यावेळी ऍड. सुहास सावंत, संजय वेतुरेकर, दयानंद चौधरी, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, अतुल बंगे, धीरज परब, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, अभय शिरसाट, सौ मेघा सुकी, श्रीराम शिरसाट, संदीप साळस्कर, विजय वालावलकर, संदीप निंबाळकर, भारती पेडणेकर, राजन नाईक आणि अन्य उपस्थित होते.
