*💫बांदा दि.२१-:* सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन देली आहे. वाढतेप्रदूषण, जंगलतोड, मोबाईल टॉवर, पिकांवर होणारी जंतूनाशक फवारणी, पर्यावरणाचा ऱ्हास या कारणामुळे अनेक प्राणी ,पक्षी नामशेष होत आहेत. चिमणी या पक्षांशी आपले नाते बालपणापासूनच आहे या पक्ष्याला वाचवायची जबाबदारी आपणा सर्वांची आहे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पक्षांना पाण्याची सोय होणे आवश्यक असते. यासाठी बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व धान्याची सोय करून या उपक्रमात कृतीशील सहभाग नोंदवला आहे. शासनाच्या ‘चिमणी वाचवा’ या अभियानाला बळकटी देण्यासाठी उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी सध्या शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली चिमणी वाचवा हा समाजासमोर राबविलेल्या उपक्रम प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांना घरातील टाकाऊ प्लास्टिकची भरणी, नारळाची करवंटी, मातीची मडकी, पुटट्याचे खोके या वस्तूंना योग्य आकार देऊन त्यांचा धान्य व पाणी ठेवण्यासाठी उपयोग करण्यात आला आहे. या वस्तू विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या व्हरांड्यात व परिसरातील झाडावर अडकविल्या आहेत. या उपक्रमात समर्थ केसरकर या विद्यार्थ्यांने उपयुक्त व टिकाऊ असे साहित्य बनवले आहे. त्याबरोबर दिप्ती धुरी, सोहम निंबाळकर, दूर्वा गवस, आर्या काळे, चैतन्या तळवणेकर,वेदांत सावंत, शिवराज गवस, यश तळवणेकर, शुभंकर वराडकर, धीरज पटेल, अंश गवस, लौकिक तळवडेकर या विद्यार्थ्यांनी कृतीशील सहभाग नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांना पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनीच हा उपक्रम राबवून पक्ष्यांना पाणी व अन्नाची सोय करून दिल्यास पर्यावरण वाचेल हे निश्चित!
बांदा केंद्रशाळेचे विद्यार्थी ‘चिमणी वाचवा’ अभियानासाठी सरसावले…
