जिल्हा नियोजन समिती सभेत खा राणे, आ राणे यांनी प्रशासनाला धरले धारेवर..
ओरोस ता ३
अखर्चित निधीवरून जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील अन्य प्रशासनाला टार्गेट करण्यात आले. २०२४-२५ चा २५० कोटींचा आराखडा असताना त्यातील प्राप्त १५५ कोटी निधीतून केवळ ३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरित निधी कधी आणि कसा खर्च केला जाणार अशी प्रश्नांची सरबत्ती जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर करण्यात आली. प्रशासन प्रमुख म्हणून तुमचा वचक नाही, असा थेट आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. खा नारायण राणे, आ निलेश राणे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत जिल्हा नियोजन सभेत यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान, जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे मान्य करीत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढील सभेत आपल्याला यात सुधारणा झालेली दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर ना नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच जिल्हा नियोजन सभा समितीच्या नवीन सभागृहात संपन्न झाली. यावेळी खा नारायण राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, आ निलेश राणे, आ निरंजन डावखरे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले सुरुवातीपासून उपस्थित होते. आ दीपक केसरकर उशिराने दाखल झाले. सुरुवातीला तासभर जिल्हा नियोजन सभा चालेल असे वाटत असताना दोन तासांहून अधिक कालावधी चाललेल्या या सभेत विशेषतः आ निलेश राणे यांनी जनसामान्यांचे प्रश्न उपस्थित करीत विरोधी सदस्याची उणीव भासू दिली नाही. त्यामुळे प्रशासन सुद्धा हडबडले.
