सहा जणांवर गुन्हे दाखल:सिंधुदुर्गनगरी येथील घटना..
सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी आणलेले २६ हजार रुपये किमतीचे पत्रे आणि प्लायवूड चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटिव्हीचा आधार घेत या चोरीचा छडा लावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी साहित्य आणण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी या साहित्यातील सिमेंट पत्रे, प्लायवूड कमी झाल्याचे येथील कामगारांना आढळून आले. एकूण २६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कामाचा ठेका घेतलेल्या वेक्सिन इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राहुल बोरसे यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात १ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. यानंतर हा तपास पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिला होता.
त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर भोसले, उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार प्रमोद काळसेकर, अनुपकुमार खंडे यांचे पथक तयार केले. या पथकाने सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणचे सीसीटिव्ही पुटेज तपासले. यात २९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता त्या ठिकाणी स्विफ्ट कार आणि टेम्पो आलेला दिसला. तसेच तेथील सिक्युरिटी गार्ड जयेश परब या गाडीतील व्यक्तींशी बोलत असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्या दृष्टीने स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपास सुरू केला असता सिक्युरिटी गार्ड जयेश परब (वय ३८) रा. नेरूर देसाईवाडा याच्या सहकार्याने आणि टेम्पो चालक ज्ञानदीप मांजरेकर (वय ४१) रा. कविलगाव नेरूर याच्या टेम्पोतून अक्षय वालावलकर (वय ३०) नेरूर ठाकूरवाडी, साईराज अणावकर (वय २९) रा पणदूर, हेमंत उर्फ राजू तावडे (वय २४) कुडाळ मधली कुंभारवाडी, श्रीपाद उर्फ मंदार बांदेकर (वय ३६) रा कुडाळ बाजारपेठ यांनी हे साहित्य चोरी केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या सहा जणांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरी केलेले साहित्य यातील तिघांच्या ताब्यात होते. ते जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.
