पालकमंत्री राणें:सोनवडे -वराड पुलाचे लोकार्पण..
⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ मालवण जोडणाऱ्या या पुलामुळे विकासाचे नवे दान उघडले आहे. कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा असाच विकास करायचा आहे. पण या विकासाच्या आड येणाऱ्या कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे काम केले जाईल, असा सज्जड इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. आहे. कुडाळ तालुक्यात सोनवडेपार येथे मालवण आणि कुडाळ या तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज सायंकाळी उशिरा संपन्न झाला, त्यालेली पालकमंत्री नितेश राणे बोलत होते.
कुडाळ व मालवण तालुका जोडणाऱ्या तब्बल १२५१.५९ लक्ष रूपये कामाच्या कर्ली खाडीवरील सरबंळ -वराड -सोनवडेपार पुलांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मस्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने १२० मीटर लांबीच्या कर्ली खाडी वरील सरबंळ टेंबवाडी सोनवडेपार,वराड रस्त्यावरील मोठ्या पुलाचे कोनशिला अनावरण करुन फित कापत लोकार्पण सोहळा मस्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी आ.निलेश राणे ,जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस उपअधीक्षक कृषिकेश रावले, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले, सोनवडे सरपंच पुर्वा धुरी, वराड सरपंच शलाका रावले, कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, दिपलक्ष्मी पडते, काका कुडाळकर, बाळा चिंदरकर, दादा साईल आदी उपस्थित होते.
या कामाच्या लोकार्पणमुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात अशाच प्रकारे विकास कामे होत राहणार आहेत. विकास कामांची ही तर सुरुवात झाली असून यापुढे विकासाची जबाबदारी आमची राहील असा विश्वास मस्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री .नितेश राणे पुढे म्हणाले की, मी माझ्या पहिल्याच बैठकीत प्रशासनाला बोललोय की, प्रशासनाने सरकार म्हणून काय -काय केले पाहिजे, आमदार निलेश राणेंनी ते आपल्या भाषणातून सांगितले आहे.आता कुडाळ मालवणच्या लोकांची रोजच दिवाळी सुरू आहे. कुडाळच्या विकासाचा बॅकलाॅक भरून येत आहे. आता निलेश राणेंच्या आदेशाने संबंधित ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये जाणार हे निश्चित आहे. यामध्ये माझी पीएचडी आहे. आम्ही विकासाला प्राधान्य देणारी लोकं आहोत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे नेहमी सांगतात की,सरकारचा पैसा हा जनतेचा असतो, तो जनतेच्या कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. कुणी चुकीचा वापर केला तर त्याला शासन झाले पाहिजे. त्यामुळे अधिकारी वर्गाने लक्ष ठेवून काम करावे. आपली दि.३ फेब्रुवारी २५ रोजी जिल्हा नियोजन बैठक आहे, त्यासाठीचा मी होमवर्क करत आहे, पण जी माहिती घेतोय ती माहिती धक्कादायक मिळत आहे. कुडाळ हा निलेश राणेंचा मतदार संघ आहे, त्यामुळे अधिकारी वर्गाने चांगली कामे करावीत.आता २०२४ पासुन कुडाळ मतदार संघाचा विकास सुकर असेल, आता जनतेने चिंता करु नये.या दोन्ही गावात निधी कधीही कमी पडणार नाही.जिल्हा नियोजनच्या बैठकीत निलेश राणे यांनी सुचविलेली कामे घेतली जातील असा विश्वास ना.राणे यांनी व्यक्त केला.
चिपी विमानतळाची पाटी बदला, कारण….
गेली दहा वर्ष जिल्ह्याचा विकास खुंटला आहे.पण आता रखडलेला विकास सुरू झाला आहे. चिपी एअर पोर्टसाठी सुध्दा काही तरी केलं पाहिजे, पण त्या विमानतळाचे उद्घाटन चपट्या पायाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले, त्यामुळे ते वारंवार नादुरुस्त होत आहे. ती पाटी आधी बदलली पाहिजे,ती कशी बदलता येईल का ? याकडे दत्ता सामंत लक्ष द्या असे ना.नितेश राणे यांनी सांगितले.
आ.निलेश राणे म्हणाले की,सोनवडे -वराड या पुलाचे २०१२-१३ मध्ये नियोजन झाले होते. सन २०१८ मध्ये या पुलाचे अंदाजपत्रक झाले, त्यावेळी पुलाचे ८ कोटी ३० लाख अंदाजपत्रक झाले. आज १५.५० कोटी रूपये झाले. दोन वर्षात हा पुल पुर्ण करायचा होता. पण ते काम पुर्ण झाले नाही. पालकमंत्री लक्ष द्या, चुकीच्या ठेकेदारांची यादी काढुन ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशी विनंती पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी श्री.पाटील यांना आ.राणे यांनी केली. सद्यस्थितीत अनेक ठेकेदारांकडे १०-१० वर्ष कामं आहेत.आजपर्यत माजी आमदार होते ते ठेकेदार होते. पण आता ते चालणार नाही.तुम्ही चांगले काम करा आम्ही पाठ थोपटु, पण चुकीच्या कामांना आम्ही सोडणार नाही. या पुलाच्या कामात रविंद्र चव्हाण यांचे पण मोठे योगदान असल्याचे आ.राणे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की,सोनवडे - वराडे पुल चांगला बांधला. पण अशाच प्रकारे या पुलाला जोडणारे रस्ते व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुलाला धोका पोहचू नये यासाठी वाळु व्यवसायिकांनी या पुलाच्या सहाशे मीटर लांब वाळु उत्खनन करावे, अशी सुचना केली.
यावेळी दत्ता सामंत,सौ.शलाका रावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनजय भोसले यांनी केले. यावेळी जमीन मालकाचे पुष्पगुच्छ देऊन ना.नितेश राणे यांच्या स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश पवार यांनी केले तर आभार सौ.काळे यांनी मानले.या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती.
