⚡वेंगुर्ला ता.२९-: कविता लिहिणे, वाचणे म्हणजे सत्याच्या जवळ जाणे होय. आपल्या अवतीभवतीचे प्रश्न कवीतेतून मांडत असताना इथल्या निसर्गाची विविध रूपे कवितेतून लिहिणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी सिद्धार्थ तांबे यांनी केले.
मराठी भाषा पंधरवडा आणि भाषा संवर्धन उपक्रमाअंतर्गत आनंददायी शनिवार याचा योग साधत २५ जानेवारी रोजी मठ येथील डॉ. रा.धों.खानोलकर हायस्कूलच्या डॉ.मधुसूदन विष्णू खानोलकर सभागृहात काव्य वाचन आणि काव्य लेखन उपक्रम पार पडला. यावेळी कवी सिद्धार्थ तांबे, कवी अरूण नाईक, मठ नं.चे मुख्याध्यापक अजित तांबे, नुतन मराठा हितवर्धक संघ मुंबईचे सदस्य प्रकाश मठकर, मठ क्र.३चे मुख्याध्यापक वीरधवल परब, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.ए.जाधव, शिक्षक पालक संघाच्या सदस्या मानसी भगत, शिक्षक गणेश नाईक, जी.एम.गोसावी, स्वप्नाली कांबळी यांच्यासह सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.
कविता ही आपल्या जीवनाला जोडून असते. जसजशी आपली जीवनाची समज वाढत जाते तशी कविता वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत जाते असे कवी अरूण नाईक म्हणाले. कवी आणि लेखक हे समाजाला घडवत असतात. नव्या राष्ट्राची उभारणी करत असतात. म्हणून समाजाने अशा प्रतिभावंतांच्या साहित्यनिर्मितीची जपणूक केली पाहिजे असे प्रतिपादन अजित तांबे यांनी केले. यावेळी रश्मी भगत, चैताली परूळेकर, सिद्धी ठाकूर, भगवान सावंत, सृष्टी सावंत या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. सूत्रसंचालन गणुराज गोसावी यांनी तर आभार स्वप्नाली कांबळी यांनी मानले.
फोटोओळी – मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
