रविकिरण तोरसकर:राज्यातील पर्यटन वाढीसाठी लवकरच १२ कैराव्हॅन विकत घेणार..
⚡मालवण ता.२३-:
राज्यातील पर्यटन वाढीसाठी एमटीडीसी तर्फे कॅराव्हॅन वाहन आणण्याबरोबरच राज्यातील थंड हवेची, ऐतिहासिक, आणि समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी हवाई पर्यटन (हेली टुरिझम) सुविधांचा व्यवहार्य अभ्यास अहवाल तयार केला जाणार आहे. यां अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हवाई पर्यटना’ला चालना देणे आवश्यक असून आंबोली,मालवण आणि देवगड ची राज्याच्या हवाई पर्यटन उपक्रमा अंतर्गत समावेश करणेही आवश्यक आहे, असे भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळा तर्फे राज्यातील पर्यटन वाढीसाठी लवकरच १२ कैराव्हॅन विकत घेणार असून सर्व सुविधायुक्त या वाहनातून राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची सफर घडवून आणली जाणार आहे. त्यासाठी सात कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हवाई पर्यटन सुविधांसाठी देखील अभ्यास अहवाल तयार केळा जाणार आहे. राज्यात पर्यटन स्थळे शहरापासून दूर अंतरावर आहेत. पर्यटकांना या पर्यटन स्थळांवर लवकर जा – ये करण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यासाठी केरळप्रमाणे हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करण्याचा एमटीडीसी प्रस्ताव तयार करीत आहे. त्यासाठी व्यवहार्य अभ्यास अहवाल तयार केला जाणार आहे. संबंधित विषयात इतर राज्यातील हवाई पर्यटन धोरणाची माहिती संकलित करणे चालू आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे तसेच निसर्गरम्य असे समुद्रकिनारे तसेच आंबोलीसारखे थंड हवेची ठिकाणे पर्यटक यांचे वेळेच्या टप्प्यात आल्यास नक्कीच पर्यटनाला मोठया प्रमाणावर चालना मिळू शकेल. त्याचबरोबर सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळचा सुनियोजित वापर होऊ शकतो. ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल व जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळेल. संबंधित विषयात पाठपुरवा सुरू केला असून जिल्ह्यातील विविध पर्यटन संस्था यांनी पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून याबाबत अभ्यासपूर्ण मांडणी पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचेकडे करणे आवश्यक आहे, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
