भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थांची मागणी..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल विचारात घेता शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूरी व्हावी, किंवा असरोंडी सजा जोडून मिळाल्यास सोईचे होईल, अशी मागणी भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थ यांनी मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरवंडे ग्रामपंचायत सदस्य तथा युवा भाजपा कार्यकर्ते रघु गांवकर यांनीही मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना शिरवंडे गावातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता तलाठी सजे बाबत स्वतंत्र निवेदन याचवेळी दिले.
यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर, चंद्रकांत गांवकर, सुरेश गांवकर, संदीप परब लक्ष्मण घाडीगांवकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. शिरवंडे हा गाव असरोंडी सजा तलाठी कार्यालयास गेली अनेक वर्ष जोडलेला आहे. परंतू सन २०२२ मध्ये सदर सजा बदलून शिरवंडे गाव किर्लोस तलाठी सजेस जोडण्यात आला. त्याप्रमाणे किर्लोस व शिरवंडे एकत्र व असरोंडी व आंबवणे गाव एकत्र सजा मंजूर झाल्या आहेत. नवीनच मंजूर झालेल्या किर्लोस तलाठी कार्यालयात किर्लोस व आंबवणे हे गाव जोडणे गरजेचे होते व असरोंडी व शिरवंडे हे गाव एकत्र राहणे गरजेचे होते. गावच्या भौगोलिक रचनेनुसार व दळणवळणाच्या दृष्टीने लोकांना ते सोईचे झाले असते. मात्र तसे झाले नाही. याचा परिणाम म्हणजे शिरवंडे गावच्या शेतकरी, ग्रामस्थांना किर्लोस येथे जाणे गैरसोयीचे होत आहे. तरी असरोंडी सजा केल्यास ते सोईचे होईल. अन्यथा शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल विचारात घेता शिरवंडे गावासाठी स्वतंत्र सजा मंजूरीचा प्रस्ताव केल्यास त्याचे ग्रामस्थांकडून स्वागतच होईल. तरी नियमानुसार योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावर तहसीलदार म्हणाल्या, याबाबत निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जातो. वरिष्ठांकडे निवेदन पाठवले जाईल आपणही पाठपुरावा करा, असे सांगितले. यानंतर रघु गांवकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगितले.
