कलाशिक्षण परिषदेत समीर चांदरकर यांच्या रांगोळीने जिंकली रसिकांची मने…

⚡मालवण ता.२२-:
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्यावतीने शहादा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक श्री. समीर अशोक चांदरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतानाच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रांगोळीतून साकारलेले साधूचे व्यक्तीचित्र लक्षवेधी ठरले. या कला शिक्षण परिषदेत समीर चांदरकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कलाशिक्षण परिषद म्हणजे कला शिक्षकांसाठी व कला रसिकांसाठी एक प्रकारचा कुंभमेळाच असतो. या कलाशिक्षण परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष बी.जी. सामंत यांच्या नेतृत्वाखाली १७ शिक्षक सहभागी झाले होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या कलाशिक्षण परिषदेत एका साधूचे व्यक्तिचित्र समीर चांदरकर यांनी साकारले. अवघ्या साडेतीन तासात चार बाय चार फुटाची ही रांगोळी चांदरकर यांनी साकारली. चांदरकर यांना जलरंगाच्या माध्यमातून निसर्ग चित्र साकारणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार राजेश आजगावकर यांचे सहकार्य लाभले. कलाशिक्षण परिषदेत उपस्थित कलारसिकांनी या रांगोळीचे कौतुक केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणेचे अध्यक्ष नरेंद्र बाराई, शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षक नेत्या सौ. शुभांगी सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. समीर चांदरकर यांना सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page