⚡मालवण ता.१८-: कालावल खाडीपात्रातील तोंडवळी येथे होणाऱ्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात दि. १५ जानेवारी पासून ग्रामस्थांनी खाडीपात्रात नौकेत बसून छेडलेले साखळी उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच होते. काल व आज असे दोन दिवस कोणताही प्रशासकीय अधिकाऱ्याने या उपोषण स्थळी भेट दिलेली नाही किंवा या आंदोलनाबाबत प्रशासनाकडून कोणतेही म्हणणे ग्रामस्थांना प्राप्त झालेले नाही. एकीकडे उपोषण सुरु असून दुसरीकडे अवैध वाळू उपसा सुरुच असून आंदोलनाला चार दिवस झाले तरी प्रशासन दाद देत नसल्याने प्रशासन ग्रामस्थांची परीक्षा पाहतेय का ? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
अवैध वाळू उपशावर कारवाई होत नसल्याने यां विरोधात साखळी उपोषण छेडल्यावर प्रशासनाने खाडीपात्रातील सीमांकन होईपर्यंत वाळू उपसा करू नये अशी नोटीस वाळू व्यवसायिकांना बजावून देखील वाळू उपसा सुरूच आहे, असा आरोप ग्रामस्थांनी करत यावर प्रशासनाचे लक्ष कां नाही, यावर प्रशासन कारवाई कां करत नाही असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच ग्रामस्थांनी वाळू उपसा करणारी नौका पकडल्यावर त्यावर कोणती कारवाई प्रशासनाने केली याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. जो पर्यंत मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे उपोषण स्थळी येऊन आमच्याशी चर्चा करत नाहीत तोपर्यंत आम्ही पकडलेली नौका परत देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
