दिलीप धोंड:सेवानिवृत्त नेवी चे कॅप्टन शिडाच्या नौकेने लुटत आहेत समुद्र सफारीचा आनंद..
⚡देवगड ता.१९-:
नेव्हीतील २७ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अंतरा या स्वमालकीच्या शिडाच्या नौकेने समुद्रसफारीचा आनंद लुटणाऱ्या नेव्हीचे सेवानिवृत्त कॅप्टन दिलीप धोंड यांनी या नौकेच्या सहाय्याने देवगड बंदरात आल्यानंतर कोकण किनारपट्टीवर देवगड बंदरासारखे सुरक्षित व सुंदर बंदर नाही असे मत व्यक्त केले.
कॅप्टन धोंड हे नेव्हीतून कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले असून त्यानंतर ते गोवा येथे राहतात.सेवेमध्ये कायम समुद्रावर सफर करणाèया धोंड यांची समुद्रसफारीची ओढ कायम असल्याचे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर सुरू केलेल्या समुद्रसफारीतून दिसून येत असून त्यांनी त्यासाठी स्वमालकीची नौका घेतली.या नौकेचे नाव अंतरा असून ही नौका पुर्णत: शिडाची आहे.या नौकेच्या सहाय्याने ते गोवा ते मुंबई, गोवा ते देवगड असा प्रवास करतात.
अंदमान निकोबार पासुन गुजरात पर्यंत त्यांनी या शिडाच्या नौकेने प्रवास केला आहे.शुक्रवारी सकाळी ते गोव्याहून देवगडला आपल्या नौकेच्या सहाय्याने निघाले त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी आणि सेवानिवृत्त कमांडर कुळकर्णी व त्यांचे भाचे होते.शनिवारी सकाळी ११ वाजता देवगड बंदरात ते आले.यावेळी त्यांनी देवगड पोलिस निरिक्षक अरूण देवकर,सागरी पोलिस विभागाचे अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी यांचीही भेट घेतली.यावेळी समुद्रसफारीची आवड असल्याने हाच आपण छंद जोपासत असल्याचे सांगून कोकणकिनारपट्टीवर सर्वांत सुंदर व सुरक्षित देवगड बंदर असल्याचे सांगीतले.
