⚡मालवण ता.१५-:
गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले असून देवगड येथील समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईट द्वारे मासेमारी करणारी चांदणी १ (क्र. IND-MH-4-MM-758) ही नौका काल मंगळवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास समुद्रात गस्त घालत असताना सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी श्री. मुरारी भालेकर व त्यांच्या पथकाने पकडली. या नौकेसह नौकेतील सुमारे १० ते १२ लाख रुपयांची एलईडी लाईट, जनरेटर व साहित्य मत्स्य विभागाने जप्त केले आहे. मात्र या नौकेत मासळी सापडून आली नाही.
मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी श्री. मुरारी भालेकर हे आपल्या पथकासह काल सायंकाळी समुद्रात नियमित गस्त घालत असताना राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली चांदणी १ नों. क्र.- (IND-MH-4-MM-758) ही नौका महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात देवगड समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना दिसून आल्याने भालेकर यांनी ही नौका पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह २ खलाशी होते. ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. मात्र नौकेत मासळी आढळून आलेली नाही. या नौकेवर असणारे सुमारे १० ते १२ लाख रुपये किमतीची एलईडी लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे (जनरेटर) व इतर सामग्री जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी श्री. मुरारी भालेकर यांनी पोलिस कर्मचारी श्री. संकेत तांडेल तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दिपेश मायबा व सागर परब यांच्या सहकार्याने हि कारवाई केली आहे. याबाबत भालेकर यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.
