आंदोलन करण्यास शिवसैनिक मागे हटणार नाही:हरी खोबरेकर यांचा इशारा..
⚡मालवण ता.१३-: चिपी विमानतळाला टाळे ठोकले तर वैभव नाईक यांच्या घराला टाळे ठोकू, असे वक्तव्य करणाऱ्या खास. नारायण राणे यांना ते खासदार आहेत, एक लोकप्रतिनिधी आहेत याचा विसर पडला आहे. गेले काही वर्षे सुरु असलेली चिपी विमानतळावरील मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा नारायण राणे खासदार झाल्यावर बंद पडली. खासदार असूनही ते विमानसेवा सुरु करू शकलेले नाहीत, हे त्यांचे अपयश असून ते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी मालवण कुडाळ मधील ७३ हजार जनता आमच्या पाठीशी आहे, हे राणे यांनी विसरू नये. ७३ हजार जनता पाठीशी असल्याने कुठलेही आंदोलन करण्यास आम्ही शिवसैनिक मागे हटणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या समवेत माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपतालूकाप्रमुख गणेश कुडाळकर, प्रसाद चव्हाण, सौ. दीपा शिंदे, सौ. निनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्ता काळात खासदार विनायक राऊत, तत्कालीन हवाई उड्डाण मंत्री यांच्या प्रयत्नातून चिपी विमान तळावरील मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवेला गती देण्यात आली होती. त्यापूर्वीच्या महायुती सरकारच्या काळातही सुरेश प्रभू यांनीही या विमानसेवेस गती दिली होती. त्यावेळी शिवसेनेवर टीका करण्याचे काम नारायण राणे यांनी केले. विमानसेवा सुरु ठेवताना अनेक अडचणी आल्या. यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला गेला. अडचणी दूर करून विमानसेवा सुरु करण्यात आली. मात्र, नारायण राणे खासदार बनल्यावर ही विमानसेवा बंद पडली. खासदार म्हणून राणे विमानसेवा पुन्हा सुरु करू शकले नाहीत. त्यांचे हे अपयश लपवण्यासाठीच ते वक्तव्ये करत आहेत, अशी टीका खोबरेकर यांनी केली.
नारायण राणे खासदार झाले, त्यांचा एक मुलगा मंत्री झाला, दुसरा आमदार झाला तरीही मालवणातील विकासकामांसाठी नवीन निधी ते आणू शकलेले नाहीत. राणेंना केवळ राणे कुटुंबाचा विकास दिसतो. मालवणात गेल्या आठवडा भरात ज्या कामांचा शुभारंभ झाला ती माजी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाली होती. धामापूर सुधारित नळपाणी योजना, सुशोभीत बंदर जेटी ही कामे वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. नाईक यांनीच मच्छिमारांच्या प्रश्नावर विधानसभेत सातत्याने आवाज उठवला, त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली. जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळालेल नाही. जिल्हा ओस पडला आहे. राणे यांचे पुत्र मंत्री झाले तरी अद्याप त्यांना जिल्ह्याचे पालकत्व दिलेले नाही, राणेना पालकत्व देऊ नये, असे त्यांच्या वरिष्ठांचे मत असेल, असा टोला खोबरेकर यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला तरी मालवम कुडाळ मधील ७३ हजार एवढी जनता आमच्या पाठीशी राहिली. त्यामुळे एवढी जनता पाठीशी असताना कोणतेही आंदोलन व काम करण्यास आम्ही मागे हटणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे, मातोश्रीचे शिवसैनिक आहोत, कडवट शिवसैनिक आहोत. अशी कोणीही वक्तव्ये करतील त्यांना त्याच जोमाने शिवसेना उत्तर देईल, जनतेला जे त्रास देतील त्याविरोधात रस्त्यावर उतरू, असेही खोबरेकर म्हणाले.
