रविकिरण तोरसकर:मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमार, सागरी पर्यावरण वादी यांच्याकडून समाधान व्यक्त..
⚡मालवण ता.११-: महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी देशातील पहिल्या ड्रोन प्रणालीची सुरुवात नुकतीच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाली. मंत्री नितेश राणे यांनी हाती घेतलेले हे ड्रोनास्त्र सागरी सुरक्षा, पर्यावरण, मत्स्य व्यवसाय ही तिन्ही क्षेत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे, असे भाजपा मच्छिमार सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारी, त्याचबरोबर परप्रांतीय मच्छीमारांच्या वाढत्या झुंडशाहीला शह देण्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात येणे गरजेचे होते. तसेच सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. सदर दोन्ही हेतू साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी ड्रोन रुपी पाहिले अस्त्र आपल्या भात्यातून बाहेर काढले आहे. मत्स्य व्यवसाय खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर गस्ती नौका आणि ड्रोन प्रणाली याबाबत तातडीने पावले उचलून भविष्यातील वेगवान निर्णयांची चाहूल मत्स्य क्षेत्राला दाखवून दिली आहे.
अतिशय उच्च तंत्रज्ञानाने युक्त असे ड्रोन महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर व जलधीक्षेत्रामध्ये लक्ष ठेवणार आहेत. तसेच मत्स्य क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी यांना त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अदृश्य ड्रोन ची सूचक इशारा देऊन सेनापती नितेश राणे यांनी आपल्या सैन्याला भविष्यातील वाटचालीची दिशा दाखवली आहे. मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील पारंपारिक मच्छीमार, सागरी पर्यावरण वादी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
