मालवणच्या जुन्या बंदर जेटीच्या मजबुतीकरणाच्या कामाचाही शुभारंभ..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण दांडी येथे दांडेश्वर मंदिरा समोरील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला जलवाहतुकीसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून उभारलेल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले. तसेच मालवण बंदरातील जुन्या जेटीच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील आम. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
मालवणात येणारे पर्यटक मोठ्या संख्येने किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. यासाठी मालवण बंदर जेटी येथून प्रवासी बोटीने पर्यटक किल्ल्यावर जातात. दांडी किनाऱ्यावरूनही सिंधुदुर्ग किल्ला- दांडी जलवाहतूक चालक मालक संघातर्फे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट सेवा पुरवली जाते. मात्र याठिकाणी जेटी नसल्याने पर्यटकांना बोटीत चढण्या – उतरण्यासाठी तरंगत्या जेटीची आवश्यकता होती. त्याबाबतची मागणी तेथील व्यवसायिकानी मेरीटाइम बोर्डाकडे केली होती. मेरीटाइम बोर्डाने ही जेटी उपलब्ध करून दिली असून त्याचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. दांडी येथील तरंगत्या फ्लोटिंग जेटीचा वापर करून प्रवासी बोटीने पर्यटकांना किल्यावर जाता येणार आहे.
दांडी चौकचार मंदिर ते मोरेश्वर किनारी बंधारा कम रस्ता व्हावा, अशी मागणी यावेळी नारायण धुरी व स्थानिक नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे करून त्याबाबत चर्चा केली. याबाबत निश्चितच प्रयत्नशील असल्याचे आम. निलेश राणे यांनी सांगितले.
जुन्या जेटीच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ
मालवण बंदरातील जुन्या जेटीवरून किल्ला प्रवासी होडी वाहतूक केली जाते. मात्र या जेटीची दुरावस्था झाली असल्याने जेटीच्या मजबुतीकरणाचे काम हाती मेरीटाइम बोर्डाकडून हाती घेण्यात आले असून त्याचा शुभारंभ आम. निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या जेटीचे मजबुतीकरणाचे काम २ कोटी रुपये खर्चून नऊ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे, जुन्या जेटीचे काम पूर्ण होईपर्यंत नवीन जेटीवरून किल्ला प्रवासी वाहतूक सुरु राहणार आहे, अशी माहिती यावेळी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे सिंधुदुर्ग प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, उपअभियंता दीपक पेटकर, शाखा अभियंता पारेश शिंदे, प्रवीण शिंदे, मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आनंद हुले, माजी नगरसेवक पंकज सादये, दामोदर तोडणकर, संदीप परब, भाजपचे कुडाळ मालवण मच्छिमार आघाडी अध्यक्ष नारायण धुरी, भाऊ मोर्जे, संदीप मालंडकर, भाजपा महिला शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, शिवसेना महिला उपाजिल्हा प्रमुख निलम शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मंदार लुडबे, सुमित सावंत, निषय पालेकर, निनाद बादेकर, स्नेहल पराडकर, मिनल परब, मेघनाद धुरी, संतोष केळूसकर, विठोबा केळूसकर, रुपेश प्रभू तसेच मच्छिमार बांधव, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
