माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश:अभाअंनिस सिंधुदुर्गने वेधले होते लक्ष..
⚡मालवण ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग या संस्थेला सहकार्य करावे, असे आदेश जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी तसेच प्राचार्य , मुख्याध्यापक , माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांना दिले आहेत. यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग शाखेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते, अशी माहिती अभाअंनिस सिंधुदुर्गतर्फे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्यात अधिनियम २०१३ थोडक्यात जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC) सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन झाली. या समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती व प्रसार प्रचार होण्यासाठी सर्व शाळा, कॉलेजमध्ये व्याख्याने आयोजित करावेत असे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौघुले यांनी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांना शाळांमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचं व्याख्यान आयोजित करण्याचे पत्र दिले होते. मात्र मागील वर्षभरात शाळा व महाविद्यालयांमध्ये या कायद्याचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद शाळांकडून मिळाला नव्हता. सदरची बाब अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली होती. तसेच जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती देऊन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली होती .
याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांना महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांचे आभार मानण्यात आले. तसेच असे व्याख्यान शाळांमध्ये आयोजित करण्यासाठी विजय चौकेकर जिल्हा संघटक (9420974775) यांच्याशी संपर्क करावा, सदरचे व्याख्यान कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन व कोणतेही मानधन न घेता देण्यात येईल, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजीव बिले, सचिव अजित कानशिडे, जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे .
