कुडाळ एमआयडीसीतील अनैतिक धंदे, दारू पार्ट्याना बसणार आळा…

पोलिसांचे विशेष पथक राहणार कार्यरत:जिल्हा पोलीस अधीक्षकांची उद्योजकांना ग्वाही;कुडाळमध्ये उद्योजकांसोबत सौरभकुमार अगरवाल यांचे चर्चासत्र..

कुडाळ : कुडाळच्या एमआयडीसी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार घडू नये यासाठी आता विशेष पोलीस पथक कार्यरत राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमांमध्ये याची घोषणा केली. तसेच या ठिकाणचे उद्योग सुरक्षित आणि निर्भयपणे करण्यासाठी उद्योजकांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य पोलीस विभाग करेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
सध्या पोलीस वर्धापन दिन साजरा केला जात आहे आणि याचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शनिवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील उद्योजकांशी संवाद साधला. एमआयडीसी असोसिएशनच्या हॉल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, सचिव नकुल पार्सेकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व्यासपीठावर उपस्थित होते.
या संवाद कार्यक्रमांमध्ये अनेक उद्योजकांनी एमआयडीसी येथे होणाऱ्या घटना सांगितल्या. बऱ्याच ठिकाणी रात्रौच्या वेळेला पार्ट्या केल्या जातात. तसेच अनेक विविध प्रकार या एमआयडीसीमध्ये घडत असतात. कधी कधी उद्योजकांना सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यांना दादागिरी केली जाते. हे कुठेतरी थांबावं अशी मागणी त्यांनी केली.
त्यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, यासाठी विशेष पथक नेमून एमआयडीसीमध्ये गस्त घातली जाईल आणि जे कोणी अशा प्रकारे अनैतिक प्रकार आणि पार्ट्या करत असतील त्यांना ताब्यात घेतले जाईल. हे आमच्याकडून जरी सहकार्य होत असले तरी उद्योजकांनी सुद्धा या ठिकाणी काम करणारे कामगार कोण आहेत ते कुठून आले त्यांची परिपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्यांमध्ये वीस पेक्षा जादा कर्मचारी आहेत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेसाठी समिती नेमणे गरजेचे आहे. बंद असलेल्या कंपन्यांमध्ये काय होते याकडे सुद्धा लक्ष उद्योजकांनी ठेवणे गरजेचे आहे. या ठिकाणी असणाऱ्या उद्योजकांना सुरक्षित आणि निर्भयपणे उद्योग करता यावेत यासाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी उभे राहू. तुमच्याही सहकार्याची गरज असून एखाद्या उद्योजकाकडे खंडणी मागण्याचे प्रकार जरी झाले तरी ते आम्हाला सांगावेत कारवाई करू जेवढी आमची जबाबदारी आहे तेवढे तुमचेही कर्तव्य आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.
एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी सांगितले कि, येथील उद्योजकांनी छोटी चोरी झाली तरी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करावी. जेणेकरून चोरी रेकॉर्डवर येईल. तसेच एमआयडीसी मध्ये नेमके किती उद्योजक आहेत त्याचा आकडा समजणं गरजेचं आहे असे एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी अधोरेखित करून पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी एमआयडीसी असोसिएशनचे सहकार्यवाह कुणाल ओरसकर, अमीत वळंजू, शशिकांत चव्हाण, राजन नाईक, दिलीप मालवणकर, प्रमोद भोगटे,संतोष राणे, एम्.आय्.डि.सी.चे अधिकारी, गुन्हे अन्वेषण विभागाचे राजेंद्र पाटील, आणि अनेक उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. नकुल पार्सेकर यांनी केले.

You cannot copy content of this page