रजत तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड…

⚡मालवण ता.०२-: सटणा मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत मालवणचा सुपुत्र रजत ज्योती रविकिरण तोरसकर व त्याच्या संघाने संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना या संघाने रौप्य पदक मिळविले असून यामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे रजत याची दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी तसेच खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच सटणा, मध्यप्रदेश येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ,मध्य प्रदेश,राजस्थान या राज्यातील विद्यापीठांचा समावेश होता. स्पर्धामध्ये पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांनी भाग घेतला होता. कु.रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले. अंतिम आठ संघामध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरीमध्ये चुरशीची झुंज देऊन संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघाने रौप्य पदक मिळवल्याने त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी रजतला मिळणार आहे.

रजत तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मार्गदर्शक व मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमीचे संस्थापक विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ.राहुल पंतवालावलकर, सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे हेमंत वालकर आणि इतर सदस्य तसेच टोपीवाला हायस्कूल आणि सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page