तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी छेडले होते आंदोलन..
कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर नवीन वर्षापासून सुरुवात झाली आहे. याप्रकरणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मागील आठवड्यात धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून नवीन वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२५ पासून कुडाळ ते बाव या मार्गाच्या संपूर्ण कामकाजाला सुरुवात झाली आहे.
या रस्त्याच्या कामकाजाची पाहणी आज, गुरुवारी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाऊन केली. या रस्त्याच्या कामकाजाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचनाही करण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेविका ज्योती जळवी, नागेश करलकर, दीपक राऊत, प्रशांत परब, सुकृत करलकर, मिलिंद मणेरीकर आदी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटोळे,
स्थापत्य अभियंता सिद्धेश पाटील, कनिष्ठ अभियंता महेश पवार हे सुद्धा कामकाजाच्या ठिकाणी हजर होते.
कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाची झालेल्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला जाग येत नसल्याने काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे आणि बाव, बांबुळी, कविलकट्टा येथील नागरिकांनी बांधकाम विभागावर धडक देत आंदोलन छेडले होते. कुडाळ ते बाव या ग्रामीण मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या मार्गाच्या दूरवस्थेमुळे दोन नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले. या मार्गाच्या दुरवस्थेबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, या निवेदनांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवली जात होती. या संदर्भात ठाकरे शिवसेना आक्रमक होवून आंदोलन छेडले होते. या रस्त्याचे काम १ जानेवारीपासून सुरू होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. अखेर ठाकरे शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ ते बाव मार्गाचे काम सुरु झाले आहे.
