प्रदीप नारकर करणार उपोषण;जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर छेडणार आंदोलन
सिंधूदुर्गनगरी ता १९ जिल्हा वार्षिक योजना आराखड्या मधून पोम्भुर्ले जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकाम व दुरुस्ती जाणीवपूर्वक प्राधान्यक्रम यादीतून डावलल्या बाबत ५ मे रोजी पासून जिल्हा परिषदेसमोर न्याय मिळेपर्यंत उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. देवगड तालुक्यात पोम्भुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाद भोळेवाडी ही सन २०१९ मध्ये पावसाळ्यात कोसळली. सदर शाळा रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वरील प्रसंग टळला. सदर मोडकळीस आलेल्या शाळेतील विद्यार्थी हे गेली दोन वर्षे अंगणवाडी इमारती मध्ये शिक्षण घेत आहेत. याबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सूचना मांडली असता या शाळेचे काम प्राधान्यक्रमाने करण्यासाठी शाळादुरुस्ती प्राधान्यक्रम यादी मध्ये समाविष्ट करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष शाळा दुरुस्ती यादी मधून या शाळेचे नाव वगळण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणसगाव गुरवभाटले ही दुर्गम भागात शाळा असून सदर शाळेची इमारत १९९२- ९३ मध्ये ग्रामस्थांनी अंगमेहनत करून इमारतीचे बांधकाम केले होते. त्यानंतर त्या शाळेची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही शाळा मोडकळीस येवून या शाळेची इमारत सन २०१९ मध्ये निर्लेखित करण्यात आलेली आहे. या याबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आपण सूचना करून या शाळा इमारतीचे प्राधान्याने बांधकाम करावे. अशी मागणी केली होती .मात्र सदर शाळेचे काम प्राधान्यक्रम यादी मधुन वगळण्यात आले आहे .अशाप्रकारे पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदार संघातील शाळांची दुरुस्ती व बांधकाम ची कामे जाणीवपूर्वक जिल्हा परिषद वार्षिक आराखड्यातुन डावलण्यात आल्याने येथील मुलांचा पावसाळ्यात शिक्षण कुठे घ्यायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या विरोधात १५ मे पासून जिल्हा परिषदेसमोर संबंधित गावातील ग्रामस्थांना समवेत घेऊन आपण स्वतः उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नेरकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना दिले आहे.
