मालवण बंदर जेटी वाहनतळाची प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान…

उमेश नेरुरकर यांनी वेधले आम. निलेश राणे यांचे लक्ष..

⚡मालवण ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागाने बाजारपेठ नजीकच्या किनारपट्टीवर उभारलेल्या वाहनतळाची बाजारपेठेत उघडणारी सर्व प्रवेशद्वारे बंद करून फक्त बंदर जेटीवरील एकच प्रवेशद्वार सुरू ठेवल्याने बाजारपेठेतील माल वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने व्यापारी वर्गाची गैरसोय होत आहे. या समस्येकडे मालवण व्यापारी संघाने आमदार निलेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

मालवण शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या तिन्ही गल्ल्यामधे सध्या माल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बंदर जेटीवरील मार्ग बंद केल्यामुळे आता मुख्य बाजारपेठेत मालगाड्या प्रवेशच करू शकत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दूरवर मालाचा ट्रक उभा करून हातगाडीने आपला माल दुकानात आणावा लागत आहे. परिणामी वाहतूक खर्चाच्या दुप्पट तिप्पट अतिरिक्त हमालीचा भुर्दंड व्यापाऱ्यांना भरावा लागत आहे. समुद्र किनाऱ्यावरून बाजारपेठेत शिरण्यासाठी जोवर स्थायी स्वरूपाचा रस्ता किंवा बंधाऱ्याची निर्मिती होत नाही, निदान तोवर तरी वाहनतळाची सर्व प्रवेशद्वारे पुर्वी प्रमाणेच उघडी करून मिळावीत, अशी मागणी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केली आहे. याबाबत नेरुरकर यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी शिष्टमंडळाने आम. निलेश राणे यांना निवेदन सादर करून व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून आपण कृपया बंदर विभागास तसे आदेश निर्गमित करावेत, आपण स्वतः वाहनतळाची प्रत्यक्ष पाहणी केल्यास विषयाचे गांभीर्य अधिक स्पष्ट होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page