आमदार निलेश राणे:शहरातील विकासकामांसदर्भात पालिका सभागृहात प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा..
⚡मालवण ता.२७-: एकविसाव्या शतकातील स्वच्छ व सुंदर शहराचे अभिवचन मालवणवासियांना दिले आहे. त्यामुळे यापुढे ज्या अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी आहे, त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडायला हवी. मी पहिल्या बैठकीत फक्त गेल्या दहा वर्षात काय झाले? यावर भाष्य करण्यासाठी आलो नाही तर पुढील पाच वर्षात शहरवासियांना काय अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. कामात हलगर्जीपणा, कामचुकारपणा खपवून घेणार नाही असा इशारा आमदार निलेश राणे यांनी आज नगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.
आमदार नीलेश राणे यांनी आज शहरातील विकासकामांसदर्भात पालिका सभागृहात प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेताना रखडलेले विकासप्रकल्प, स्वच्छता मोहिम, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट, कर विभागणी, सीआरझेड, शहर विकास आराखडा आदी सर्वच विषयांवर पालिकेची परिस्थिती आणि शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ यावर सविस्तरपणे चर्चा केली.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी शहरातील विकासकामे व इतर कामकाजाची माहिती दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, अशोक सावंत, भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, संदीप परब सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दिपक पाटकर, उमेश नेरूरकर, बबन शिंदे, राजा गावकर, पंकज सादये, राजन वराडकर, शर्वरी पाटकर, ललीत चव्हाण, राकेश सावंत, निषय पालयेकर, संतोष साटविलकर, किसन मांजरेकर, राजू आचरेकर, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, संदीप मालंडकर, किशोर खानोलकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आम राणे म्हणाले,
प्रत्येक विषयावर फक्त चर्चा न करता त्यावर उपाय काय करता येईल. काही विषय हे जागेवर सोडविले आहेत. काही विषयांसाठी तांत्रिक अडचण आहे ती अधिकाऱ्यांनी मला सांगितली मी समजून घेतली जी प्रशासनाकडे द्यायची आहे ती प्रशासनाकडे, जे काही अडचणीचे विषय आहेत ते मला घेऊन जायचे त्याची जाणीव मला झाली आहे. एक चांगलं सुंदर शहर, २१ व्या शतकातील शहर दिसण्यासाठी ज्या काही गोष्टी करणे गरजेचे आहे ते सगळे सहकार्य मदत असेल ती एक आमदार या नात्याने प्रत्येक विभागाला आवश्यक मदत देण्याची मी ग्वाही दिली आहे. माझ्याकडूनही कसलाही कामचुकारपणा चालणार नाही. मागच्या दहा वर्षांमध्ये काही चुका झाल्या असतील, काही गोष्टी राहिल्या असतील, काही गोष्टी दुर्लक्ष झाल्या असतील, कोणा लोकप्रतिनिधींचे लक्ष नसेल पण आता इथे आमदार बदलले आहेत, खासदार बदलले आहेत. आता तसा कामचुकारपणा चालणार नाही. आता प्रत्येकाला जनतेला उत्तर द्यावं लागेल. आपण ज्या खुर्चीवर बसतो. त्याला न्याय द्यावा लागेल. अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. माझ्यासहित म्हणजे मी पण त्याच्यापासून वंचित नाही. मला पण माझी जबाबदारी आहे आणि म्हणून तर अधिवेशनाच्या अगोदर अशाच आढावा बैठका घेण्यात येतील, असेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
शहरातील नळपाणी योजनेच्या कामाला ऑक्टोबरमध्ये वर्कऑर्डर दिल्यानंतर जर काही अडचणी तांत्रिक म्हणून त्याच्यात होत्या. त्यावर आपण तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. त्यावर मुख्याधिकारी यांनी आजच आम्ही ठेकेदारांना सांगणार आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे उद्यापासून ते काम सुरू होईल. शहरवासियांसाठी शासनाने ३८ कोटींची नळपाणी योजना मंजूर केली आहे. यामुळे हा प्रश्न आज निकाली निघाला आहे, असेही श्री. राणे म्हणाले. तसेच सीरआरझेड संदर्भात काही समस्येसाठी पाच लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता, तोही खर्च श्री. राणे यांनी आपण स्वतः देत असल्याचे सांगत तोही प्रश्न निकाली काढला. शहरात दर चार वर्षांनी करण्यात येणारी कर वाढ ही भुषणवह गोष्ट नाही, शहरातील जनतेला आवश्यक सुविधा निर्माण करताना पालिकेने स्वतःचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर वाढ करणे म्हणजे मार्ग काढणे नाही तर आधी स्वतः सक्षम बनण्यासाठी किमान दहा ते पंधरा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राणे यांनी दिले.
शहरातील वाहतुकीची कोंडी यावर रिंग रोडची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी आपली चर्चा सुरू आहे. एक परिपूर्ण आराखडा तयार झाल्यानंतर शहरातील नागरिक, तसेच देवबाग, तारकर्ली, वायरी येथील जनतेच्या फायद्याचे रस्ते रिंग रोडच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. यात कोणालाही विस्थापित न करता कामे केली जाणार आहेत. मात्र त्यापुर्वी आराखडा बनविण्यात येणार आहेत. शहराला रिंग रोड आणि बाहेरून कनेक्टिव्हिटी आपल्याला गरजेची आहे. गेल्या १० वर्षात यावर काहीच काम झालेनाही, असेही श्री. राणे म्हणाले.
शहराला नगरोत्थान योजनेतून किमान २० ते २५ कोटी रूपयांचा निधी विकासकामांसाठी दरवर्षी उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तुम्ही शहराच्यादृष्टीने आवश्यक असणारे परिपूर्ण प्रस्ताव द्या, निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे, असेही श्री. राणे यांनी सांगितले. शहरातील कचरा समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी फॅक्टरी याठिकाणी निर्माण होणे गरजेची आहे. कचरा उठविण्यासाठी कामगार वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
