कुडाळ येथे आयोजन:जीएसटी बाबत अनेक मुद्द्यावर चर्चा..
⚡कुडाळ ता.१४-: गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने जीएसटी आणि टॅली प्राइम 5.1 या विषयावर आयोजित सेमिनार कुडाळ येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सीए शैलेश मुंडये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जीएसटी कायदा, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सेमिनारला जिल्हाभरातून जीएसटी प्रॅक्टिशनर्स उपस्थित होते.
प्रथम सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक ॲड. अभिजित बेर्डे यांनी जीएसटी ॲमनेस्टी योजना आणि जीएसटी कायदा कलम १६(४) अन्वये केलेल्या ऑर्डर वरील उपाययोजना या बाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्गचे जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित पोरे यांनीही उपस्थित राहून समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले.
दुपार सत्रात इन्कम टॅक्स ऑफिसर (टीडीएस) कोल्हापूर राम यादव यांनी टीडीएसच्या संदर्भातील सल्लागारांच्या प्रत्यक्ष येणाऱ्या समस्या जाणून घेत, त्यावर बहुमोल मार्गदर्शन केले. यानंतर केदार वझे यांनी टॅली प्राइम ५.१ या नवीनच आलेल्या अपडेट बाबत सखोल माहिती दिली. त्यांनी प्रामुख्याने या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेळेची बचत करत, अचूक काम कसे करता येईल याची व्यवहारातील प्रात्यक्षिके दिली.
सेमिनारला जिल्ह्यातील विविध कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाऊंटंस् यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्ञानवर्धक सत्रांमुळे सहभागी सदस्यांना जीएसटीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यास आणि टॅली प्राइमचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले.
सीए शैलेश मुंडये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सेमिनार मध्ये सूत्रसंचालन सीए युगांत चव्हाण यांनी केले तर सीए जबक मालदार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेच्या सेमिनार कमिटी पदाधिकारी सीए जबक मालदार, सीए सर्वेश प्रभुखानोलकर, सदानंद सामंत, भूषण तेजम, अमेय पालव यांनी विशेष परिश्रम घेतले.
