पिग्मी एजंटवर आकसाने कारवाई…

सुशांत नाईक:जिल्‍हा बँकेच्या ओरोस कार्यालयासमोर उपोषण छेडणार..

⚡कणकवली ता.१२-: केवळ शिवसेना पक्षाचे काम करतात म्‍हणून मोंड येथील जिल्‍हा बँकेच्या एका पिग्मी एजंटला काढून टाकण्यात आले आहे. दरमहा सुमारे तीन लाखाची उलाढाल असूनही राजकीय आकसापोटी या पिग्मी एजंटवर कारवाई करण्यात आली आहे. या विरोधात सोमवारी १६ डिसेंबरला जिल्‍हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयासमोर आपण लाक्षणिक उपोषण करणार असल्‍याची माहिती युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज दिली. कणकवलीत श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके होते. सुशांत नाईक म्‍हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. मोंड येथील पिग्मी एजंट सायली घाडी ह्या मागील २४ वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्‍यांची दरमहा ३ लाख रूपयांची उलाढाल आहे. मात्र त्‍या शिवसेना पक्षाचे काम करतात म्‍हणून त्‍यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. नाईक म्‍हणाले, जिल्‍हा बँकेच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच सभा झाली. यात आयत्‍या वेळेच्या विषयामध्ये पिग्‍मी एजंट सायली घाडी यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सर्व प्रकार म्‍हणजे सुडाचे राजकारण आहे. जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याने जर भाजप पक्षाचे काम केले नाही तर त्‍यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असाच संदेश यातून दिला जात आहे. किंबहुना जिल्‍हा बँकेतील कर्मचाऱ्यांना, लाभार्थींना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षप्रवेश करण्यासाठी दबाव देखील आणण्यात आला होता. नाईक म्‍हणाले, सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्हा बँकेचे रोपटे लावले. त्यांनी कधीच आकसाने कारवाई केली नाही. मात्र जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सायली घाडी याना पिग्मी एजंट पदावरून काढून टाकण्यात आले आहे. एकीकडे लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा रक्कम देत असताना सिंधुदुर्गात मात्र आमदार नितेश राणे हे राजकीय आकसाने जिल्हा बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आहेत. याविरोधात सोमवारी १६ डिसेंबरला आपण एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत. तसेच घाडी यांना पुन्हा सेवेत न घेतल्‍यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

You cannot copy content of this page