शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, सर्व शासकीय कार्यालये, पर्यटन स्थळे, गावोगावी, बँक, ए.टी.एम. सेंटर, एस.टी. स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन येथे करणार उपक्रम
ओरोस ता ४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुक, अंमलीपदार्थ संदर्भातील गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांना व गुन्हेगारांना आळा बसविण्याकरीता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, सर्व शासकीय कार्यालये, पर्यटन स्थळे, गावोगावी, बँक, ए.टी.एम. सेंटर, एस.टी. स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन येथे सायबर जनजागृती, नशामुक्ती व डायल 112 बाबत जनजागृती अभियान ५ डिसेंबर पासून राबविण्यात येणार आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. भारतात प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्यावरून ऑनलाईन बँकींग ट्रान्झेक्शन करण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. स्मार्ट मोबाईल फोन वापरताना लहान किशोरवयीन मुले, तरुण-तरुणी, गृहीणी यांनी ते मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी, जेणेकरून ऑनलाईन होणारे फ्रॉड थांबतील तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करता येईल व नागरीकांची होणारी फसवणूक देखील कमी होईल, यासाठी सायबर सिक्युरीटी व जनरल अवेरनेसबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचेत जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयामधील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेतील विदयार्थी लहान वयात मादक द्रव्यांच्या व्यसनाधिनतेकडे ओढले जातात. त्याचप्रमाणे इंटरनेटच्या अतिवापर व अज्ञानामुळे वाईट मार्गाला जातात. याकरीता त्यांना सायबर जनजागृती, नशामुक्ती, डायल 112 बाबत अवगत करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करून विध्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. जेणेकरून तरूण पिढी स्वतःचे व आपल्या परीवाराचा संभाव्य सायबर गुन्ह्यांपासून, व्यसनाधीनते पासून बचाव करु शकतील.
यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे दिनांक ५ डिसेंबर २०२४ ते १६ डिसेंबर २०२४ या मुदतीत सायबर जनजागृती, नशामुक्ती व डायल 112″ या विषयावर जनजागृती करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा विद्यालये व महाविदयालयांमध्ये मार्गदर्शन व्याख्याने, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भित्तीचित्रे, रॅली, पोस्टर व बॅनर वाटप असे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तित जास्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जावून तेथील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत-जास्त शिक्षक व विद्याथी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरीक, ग्रामस्थ, पर्यटक यांचेपर्यंत पोहोचून त्यांचेमध्ये जागृकता निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, इत्यादी शासकिय कार्यालय, बचत गट, पेन्शन धारक ग्रुप, सामाजिक संस्था यांना जनजागृती मार्गदर्शनपर व्याख्याने देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामधील उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी व कणकवली तसेच सर्व 13 पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, इत्यादी ठिकाणचे नेमणुकी पोलीस अधिकारी व अंमलदार आपला सहभाग नोंदविणार आहेत.
या सायबर, नशामुक्ती व डायल 112 जनजागृती अभियान यशस्वी करण्याकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तित जास्त विद्यार्थी, पालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पर्यटक यांनी आपला सहभाग दर्शवावा असे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
