सामाजिक आरोग्य उंचावण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक…

डॉ. विशाल रेड्डी:कणकवली महाविद्यालयामध्ये जागतिक एड्स दिन उत्साहात संपन्न…

⚡कणकवली ता.०४-: एच.आय.व्ही.-एड्स बद्दलची गंभीरता खेडेगावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, तरच एड्सचे संपूर्ण निर्मूलन होऊ शकते. सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी युवकांनी जनजागृती मध्ये सहभागी व्हावे. स्वतःला व्यसनापासून दूर ठेवावे असे मत डॉ. विशाल रेड्डी यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, एकात्मिक समुपदेशन व चाचणी कक्ष, कणकवली आणि जागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एच.आय.व्ही.-एड्स जनजागृती अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 01 डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कणकवली कॉलेज, एच.पी.सी.एल. हॉल मधील कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. राजेश वर्धन म्हणाले की, सामाजिक बांधिलकी म्हणून युवक युवतीने एच. आय.व्ही.-एड्स निर्मूलनासाठी सोशल मीडिया मधून जनजागृती करणे आवश्यक आहे. कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. राजेश पालव म्हणाले की, एच. आय. व्ही.- एड्स जनजागृती कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक, सामाजिक संस्था व प्रशासनाचा सहभाग कौतुकास्पद आहे. यामुळे सामाजिक आरोग्य चांगले होण्यासाठी मदत होईल.
प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सोमनाथ कदम म्हणाले की, विद्यार्थी व सर्व नागरिकांनी “माझे आरोग्य माझा अधिकार” हे ब्रीद लक्षात ठेवावे. स्वतःला सुरक्षित ठेवावे कारण जो सावध तोच सुखी. सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर डॉ. रिया पालव, श्री अशोक नारकर, आणि श्री प्रशांत बुचडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांतर्गत चित्रकला, पोस्टर आणि सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेमध्ये कु. निशांत राणे, कु. मोहित सुतार, कु. किमया गोसावी, कु. श्रेया कदम, कु. तुषार मेस्त्री यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक आला. पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये कु. सायली मेस्त्री, कु. अर्चना राठोड, कु साक्षी परब, कु. अमिषा लाड, कु. सारिका इंडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनात क्रमांक प्राप्त केले. तर सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेमध्ये कु. धनंजय कांबळे, कु. तनुजा सावंत, कु. मनीष गिरकर, कु. रोशन चव्हाण, कु. साक्षी काढवे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.
कार्यक्रम प्रसंगी जागृती फाउंडेशन मार्फत पथनाट्य सादर करण्यात आले तसेच कणकवली कॉलेज ते कणकवली एस टी स्टँड पर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. या सर्व अभियानाचे नियोजन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री. विजयकुमार वळंजु, सर्व विश्वस्त, सदस्य, प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. एम. एच. पाटील , श्री सुनील ढोणुक्षे, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, प्रा. आदिती मालपेकर, प्रा. पूजा मुंज यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. किरण जगताप यांनी मानले. प्रसंगी 235 विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page