बंदर जेटी परिसरात पर्यटक वाहनांकडून शुल्काच्या नावाखाली अनधिकृतपणे पैशांची लयलूट…

बंदर विभाग मात्र सुशेगाद:परजिल्ह्यातील पर्यटकांकडून व्यक्त होतोय तीव्र संताप..

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहरातील नवीन बंदर जेटी परिसरात वाहनतळावर अद्याप कोणतेही अधिकृत शुल्क आकारण्याची कार्यवाही झालेली नसताना याठिकाणी गाड्या पार्किंग करणाऱ्या पर्यटकांकडून खासगी पार्किंगच्या नावाखाली अनधिकृतरित्या पैशांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीही पर्यटकांचे पार्किंग वसुली करणाऱ्यांसोबत वाद झाल्याच्या चर्चा जेटी परिसरात रंगल्या होत्या. मात्र हा प्रकार गेले अनेक दिवस सुरु असतानाही बंदर विभाग सुशेगात राहून याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पर्यटन नगरी मालवणमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरु असून देश, विदेशातील पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल होत आहेत. मालवणात आधीच पार्किंगच्या सुविधेची वानवा असताना मालवणच्या किनाऱ्यावर तसेच नवीन बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या अखत्यारितील वाहनतळावर पर्यटक आपल्या गाड्या पार्क करतात. बंदर विभागाच्या वतीने गतवर्षी नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन बंदर जेटी परिसरातील सर्व स्टॉल्स हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे येथे खासगी वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांना या रिकाम्या जागेत आपली वाहने उभी करता येत होती. त्यामुळे या भागातील पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्याही दूर होण्यास मदत झाली.

मात्र सध्या या नवीन बंदर जेटी परिसरातील वाहनतळावर गाड्या पार्क करणाऱ्या पर्यटकांकडून खासगी पार्किंगच्या नावाखाली पर्यटकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पार्किंग फी म्हणून पैसे आकारणीसाठी जी पावती दिली जात आहे त्यावर कोणताही रजिस्ट्रेशन क्रमांक नाही. अधिकृत पार्किंग नसताना खासगी पार्किंगच्या नावाखाली पर्यटकांकडून पैशाची लूट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बंदर विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page