⚡कुडाळ ता.१४-: 10 नोव्हेंबर 2024 चा प्रसन्न आणि अत्यंत चैतन्यदायी दिवस आपल्यासाठी अविस्मरणीय ठरला त्याचं खास कारण म्हणजे या दिवशी झालेला पणदूर हायस्कूलच्या 1992-93 च्या दहावी बॅच चा स्नेहमेळावा. या निमित्ताने 25 विद्यार्थी एकत्र जमले ते मुळदे येथे असलेल्या कोकण हेरिटेज या निसर्गरम्य परिसर असलेल्या रिसॉर्टमध्ये.. 31 वर्षानंतर होणारी आपल्या वर्गमित्रांची भेट ही प्रत्येकासाठी अविस्मरणीय अशीच होती…या सर्वाना एकत्र आणण्याचे श्रेय जाते ते दिनेश, गुणेश, राजू, अनंत ,सुनील स्वाती आणि त्यांच्या टीमला. उत्तम रिसॉर्ट निवडण्यापासून, सर्वांची येण्याजाण्याची सोय करण्यापासून ते संविता आश्रमाला भेट देण्यापर्यंत किती नियोजन बद्ध तयारी केली होती याचा प्रत्यय या दिवशी सर्वानाच आला.
दिवसाची सुरुवात या बॅचला शिकवणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन करून आणि हयात नसणाऱ्या गुरूंना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.. सर्वांच्या संपर्कामध्ये असणारा, भारदस्त आवाजात सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारा आणि सगळं नियोजनाप्रमाणे पार पाडण्यासाठी दिवसभर धडपड करणारा दिनेश खूप भाव खाऊन गेला.. गेली 31 वर्षे जीवनाच्या वेगवेगळ्या थांब्यांवरच्या, विखुरलेल्या 10वीच्या प्रवाशांना एकत्र करून एक सुखद सफर दिनेश भाऊने घडवून आणली. सरस्वती प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन, सर्वांचं स्वागत झाल्यावर आपली ओळख करून देताना आयुष्यात वाटचाल करताना आलेले अनुभव एकमेकांसोबत वाटले.. अजयच्या थट्टा मस्करीने वातावरण एकदम अनौपचारिक झाले. शिल्पाने तर दीर्घ संवाद साधत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले..पुण्याहून आलेली मुक्ता, मुंबईचे किशोर, शांती, धैर्यशील खास गेट टुगेदर साठी कोकणात आले त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. मेघश्याम, कमल, ज्योत्स्ना हे 12वी चे बॅचमेट्स, 10च्या बॅचमध्ये कधी सामावून गेले हे कळलंच नाही. विनया, वंदना, वैशू, अंजना, शीतल, स्मिता, शिल्पा या सगळ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावरील बालमैत्रिणी भेटल्याचा आनंद आणि उत्साह अधिकच ऊर्जा देणारा होता..धैर्यशीलने केलेला स्नेहमेळाव्याचा बॅनर अप्रतिमच..राजू राणे ने गेट टुगेदरच्या निमित्ताने आपल्या व्यवसायाचेही चवदार मार्केटिंग केले.राजू च्या चविष्ट खोबऱ्याच्या वड्या पार मुंबई पर्यंत पोचल्या…ऍडव्होकेट वर्षा आपल्या व्यस्त दिनचर्येंतून वेळ काढून सर्वांसोबत ‘एक उनाड दिवस ‘ एन्जॉय करत होती हे विशेष.. चहापाणी, नाश्ता, कोल्ड्रिंक, शाकाहारी, चिकन, सुरमई जेवण, फलाहार यावर सर्वांनी मनसोक्त ताव मारला..शांतीने दिवाळी स्पेशल बनवलेल्या चकल्यांची चव काही न्यारीच…
दररोजच्या व्यापातून एक दिवस रिलॅक्स मिळालेल्या माझ्या सर्व मैत्रिणी गप्पाटप्पा, धमाल मस्ती, शाळेच्या आठवणी यात रमल्या होत्या.. तर मित्रमंडळी स्विमिंगपूलची मजा अनुभवत होते..सर्व वर्गमित्रांनी मैत्रिणींची उत्तम बडदास्त ठेवली होती.. पहिल्यांदा मुलींना समोर ताटं आणून दिल्यावर ,मगच त्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला हे कौतुकास्पदच..
संध्याकाळच्या वेळेत लगोरी, संगीत खुर्ची खेळून सर्वजण भूतकाळात 31 वर्ष मागे गेले.. सुधाने संगीत खुर्ची जिंकून राजुने जाहीर केलेले बक्षीसही पटकावले.. संसाराच्या व्यापात बुडालेल्या सुधामधील मुक्तपणे बागडणारी एक लहान निरागस मुलगी त्यानिमित्ताने जवळून पाहता आली. गुणेशने ही स्वातीच्या इन्स्टंट कवितेसाठी ग्रुपवर जाहीर केलेले बक्षीस देऊन तिला माहेरची दाद दिली. स्वातीच्या कवितासाठी एक सुंदर व्यासपीठ मिळाले. अनंत आणि धैर्यशीलने दिवसभराचे निवांत आणि मौजमस्तीचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये अचूक टिपले आणि गेट टुगेदरला येऊ ना शकलेल्या मित्रमैत्रिणींसाठी ग्रुपवर मेजवानी दिली आणि त्याला रश्मीची ग्रुपवर तत्परतेने मिळणारी दाद सुखावून गेली. स्नेहमेळाव्याला येण्यासाठी रोज दिवसांचा काऊंटडाऊन मोजणाऱ्या किशोरचा उत्साह तर रंगीबेरंगी वेशभूषा बदलत ओसंडून वाहत होता.
दिवसभर मनसोक्त फोटोग्राफी करून शेवटी जाताना सर्वांनी पणदूरच्या संविता आश्रमाला भेट दिली. निराधार बांधवांसाठी मदतीचा एक हात पुढे केला..एकत्र यायला 31 वर्षे लागली याची खंत न बाळगता जुन्या आठवणीसोबत स्नेहमेळाव्याच्या मधुर स्मृती अन नवीन ऊर्जेचीची शिदोरी घेऊन एकमेकांना निरोप दिला तो पुढच्या स्नेहमेळाव्याचे आश्वासन घेऊनच आणि दरवर्षी स्नेहमेळाव्यातील बॅचमेट्स ची संख्या वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे पक्के करूनच ….या स्नेहमिलनाच्या निमित्ताने मधल्या काळात दुरावलेल्या निखळ मैत्रीची वीण अधिकच घट्ट झाली.. हे मैत्रीचे नाते आयुष्यभर असेच अखंड राहो आणि सर्वाना दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻. …….. ……..
प्रज्ञा कुलकर्णी – रांगणेकर, माणगांव
