मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नये…
कुणाल किनळेकर:अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापी मदत करणार नाही…
कुडाळ : मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापि मदत करणार नाही.
सावंतवाडी मतदारसंघात जनतेने तीन वेळा आमदारकीची संधी दिलेले दिपक केसरकर हे आपल्या सात वर्षाच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स कारखाना, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यासारख्या यांसारख्या अपूर्ण आश्वासनाखेरीज कोणतेही ठोस काम करू शकलेले नाही. याउलट परप्रांतीय मायनिंग व्यावसायिकांना मदत करताना स्वतः कोणते उद्योग आणू न शकलेल्या केसरकरांनी आरवली सागर तीर्थ येथिल नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या स्थानिक जवळपास २०० वाळू व्यवसायिक कुटुंबांना देशोधडीला लावून परप्रांतीय उद्योजकाला मदत केली, ही यांची ओळख.
मतदारसंघातील रोजगार आणि आरोग्य या महत्त्वाच्या प्रश्नांवर अपयशी ठरलेले आमदार राज ठाकरे यांना मानणारा मतदार व महाराष्ट्र सैनिक हे आपल्याकडे वळावे म्हणून अशाप्रकारची वक्तव्ये करत आहे. तसेच यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणतेही आदेश नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत तटस्थ भूमिकेत आहे. असे कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
