विनायक राऊत: हिम्मत असेल तर राणेंनी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आमच्या गाड्या अडवून दाखवाव्यात…
⚡सावंतवाडी ता.१०-: गेली पंधरा वर्षे विकासाच्या नावाखाली फक्त थापेबाजी आणि पोपटपंचीगिरी करण्याचे काम येथील स्थानिक आमदाराने केले आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाच्या या गद्दार उमेदवाराला जनता घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली. दरम्यान राजन तेली एक अनुभवी नेते आहेत गेले अनेक वर्षे ते या मतदारसंघात काम करतात त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते या मतदारसंघाचे आमदार होतील असा विश्वास श्री राऊत यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले केसरकर यांनी या मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवले उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या प्रकल्पावर बसून राहण्याचे काम त्यांनी यावेळी केले . त्यामुळे गेले अनेक वर्ष फक्त लोकांना थापेबाजी करून लोकांना दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे अशा उमेदवाराला आता जनता या मतदारसंघात थारा देणार नसून नक्कीच यावेळी या मतदारसंघात परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला अकार्यक्षम खासदार लाभला आहे केवळ पैशाच्या जीवावर निवडून आलेले खासदार आहेत त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलू नये, हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे पेक्षा आमच्या गाड्या अडवून दाखवाव्यात असा इशारा श्री राऊत यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजन तेली, रुपेश राऊळ, जानवी सावंत आदी उपस्थित होते.
