…. तर राजकारण सोडेन विलास साळसकर यांनी घेतली भीष्मप्रतिज्ञा

देवगड : प्रतिनिधी

राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महायुतीची सत्ता आहे; मात्र देवगडमध्ये शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये अद्याप मनोमिलन झालेले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यावर आमदार नितेश राणे यांच्या समवेत दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधून मनोमिलन घडवून आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांची साथही महत्वाची आहे. जर मनोमिलन घडवून आणण्यात अयशस्वी झालो, तर राजकारण सोडून देईन, अशी भीष्मप्रतिज्ञा शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी घेतली.

देवगड तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विलास साळसकर बोलत होते. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख दिनेश गावकर, महिला उपजिल्हाप्रमुख सारीका राऊत, तालुकाप्रमुख नीता वरक, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक रोहन खेडेकर उपस्थित होते.

शुक्रवारी सायंकाळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत शिवसेना देवगड संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषदेत साळसकर यांनी महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी एकत्रितपणे प्रचार करणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये नाराजी होती; मात्र जिल्ह्यात धनुष्यबाण चिन्हाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने शिवसैनिकांमधील नाराजी दूर झाली असून उत्साह निर्माण झाला आहे. सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून विजयाची हॅटट्रिक १०० टक्के होणार, मात्र गाफील राहून चालणार नाही, असेही साळसकर यांनी सांगितले.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याची ओळख नारायण राणे यांच्यामुळेच झाली, हे नाकारता येत नाही. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. नगरपालिका क्षेत्रात भाजप व शिवसेनेमधील दुरावा काही दिवसांत दूर होईल.

दोन्ही बाजूंकडून चुका झाल्या आहेत; मात्र निवडणुकीनंतर समन्वय साधून मतैक्य केले जाईल. यामध्ये नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांचीही साथ महत्वाची आहे. आता निवडणुकीत पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे ते काम करतील व प्रचार यंत्रणेत सक्रिय होतील, असे साळसकर यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page