हरी खोबरेकर:भाजपमधील कार्यकर्ते राणे यांच्या भूलथापाना, आश्वासनांना कंटाळून ठाकरे शिवसेनेत येत आहेत…
मालवण (प्रतिनिधी)
आम. वैभव नाईक हे निष्क्रिय आमदार असल्याची टीका खास. नारायण राणे यांनी केली. मात्र याच केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना आज आपल्या मुलासाठी दारोदारी फिरून प्रचार करावा लागत आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर चार दिवस त्याठिकाणी भेट देण्यास वेळ नसलेले राणे आज मुलासाठी वेळ देत आहेत, घरोघरी जात आहेत, कोणाला धमक्या तर कोणाला आमिषे देत आहेत. आम. वैभव नाईक हे आजवर सातत्याने गावागावातील लोकांशी संपर्कात असल्याने राणेंवर ही वेळ आम. नाईक यांच्यामुळेच आली असून हीच आम. नाईक यांच्या कामाची पोचपावती आहे, असे ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मालवण येथील ठाकरे शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, उमेश मांजरेकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, सोनाली डिचवलकर, प्रसाद चव्हाण, उमेश चव्हाण, मधु लुडबे, संदेश कोयंडे, शशिकांत यादव, सदा लुडबे, तेजस लुडबे, राहुल जाधव आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर चार दिवस नारायण राणे यांना भेट देण्यास वेळ नव्हता. आम. वैभव नाईक हे क्षणार्धात त्याठिकाणी कसे पोहचले यावरून मात्र आरोप करण्यात आले. पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने निषेध मोर्चा काढण्याचे ठरविल्यानंतर महाविकास आघाडी छत्रपतींवरून राजकारण करत असल्याचा आरोप राणेंनी केला. मालवणातील झेंडा आंदोलनात पुढाकार घेऊन काम करणारे राणे असे आरोप करत असतील तर झेंडा आंदोलनही राणेंनी छत्रपतींवर राजकारण म्हणून केले का? असा सवाल हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला. नारायण राणे हे केवळ आदित्य ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आणि आपण काहीतरी केले हे पक्षश्रेष्ठीना दाखविण्यासाठी तसेच निष्क्रिय खासदार राहिलेले निलेश राणे हे दादागिरी आणि दंडूकेशाही करण्यासाठी राजकोटवर उपस्थित झाले होते. मात्र, या दंडूकेशाहीला आम्ही भीक घालत नाही हे शिवप्रेमींनी त्यावेळी दाखवून दिले, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
भाजपमधील कार्यकर्ते राणे यांच्या भूलथापाना, आश्वासनांना कंटाळून ठाकरे शिवसेनेत येत आहेत. मात्र, नंतर याच कार्यकर्त्यांना धमक्या देऊन पुन्हा जबरदस्तीने भाजपमध्ये घेतले जात आहे. मनाने दुखावलेले हे कार्यकर्ते भाजपने परत घेतले तरी ते मनापासून काम करणार नाहीत, त्यामुळे नारायण राणे यांनी हे थोतांड बंद करावे, राणे यांची ही दंडूकेशाही २००५ पासून जनतेने बघितली आहे, अनेक आघात जनतेने बघितले आहेत, त्यामुळे जनता आता या दंडूकेशाहीला भीक घालणार नाही. जनतेने नारायण राणे यांचा एकदा व निलेश राणे यांचा दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे राणेंनां जनाधार राहिलेला नाही, म्हणून त्यांच्यावर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे, अशी टीका हरी खोबरेकर यांनी केली.
ज्या नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंना ध्रुतराष्ट्र म्हटले, ज्या निलेश राणे यांनी बाळासाहेबांना खुनी म्हटले, त्याच राणे पिता-पुत्राना आज बाळासाहेबांचा फोटो घेऊन आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा बॅच लावून फिरावे लागत आहे, हीच नियती आहे. आणि नियतीच राणेंचा पराभव करेल, ठाकरे शिवसेनेची मशाल मतदारांच्या रूपाने ज्वालामुखी होऊन मत टाकेल, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
यावेळी मंदार केणी म्हणाले, नारायण राणे हे आम. वैभव नाईक यांच्यावर विकासकामे न केल्याचा आरोप करतात. आरोग्य यंत्रणेवर नारायण राणे बोलत आहेत. मात्र, गेल्या ३५ वर्षात अनेक मंत्री पदे भूषविलेल्या, मुख्यमंत्री, व केंद्रीय मंत्री राहिलेल्या तसेच ज्यांचा एक मुलगा आमदार आहे व दुसरा खासदार होता त्या नारायण राणे यांनी आरोग्य यंत्रणेवर बोलणे हे एक आश्चर्यच आहे. राणे यांच्या आजवरच्या कारकिर्दीत जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था का सुधारली नाही ? आजही लोकांना अधिक उपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूरला जावे लागत आहे. राणे यांनी स्वतःचे हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारले. मात्र, जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज काढू शकले नाही, ३५ वर्षात इथल्या आरोग्य विषयक मूलभूत सेवा सुविधांकडे राणेंनी दुर्लक्ष केले, अशी टीका मंदार केणी यांनी केली. नारायण राणे हे स्वतः खासदार, कणकवलीत नितेश राणे आमदार असताना आता निलेश राणे यांना मालवण कुडाळ मतदार संघात उतरवत आहेत. याचा भाजप पक्षाने विचार केला पाहिजे, भाजपने जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांना न्याय व आधार दिला नाही. भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम राणेच करणार आहेत, असेही केणी म्हणाले.
