बाळु सावंत यांची मागणी:महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर..
⚡बांदा ता.२२-: बांदा शहरात औद्योगिक, वाणिज्य तसेच घरगुती वीज वापरात वाढ झाल्याने तसेच शहरात सततच्या कमी दाबाच्या वीज पुरवठा समस्येतून सुटका होण्यासाठी असल्याने बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती करावी अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.
श्री सावंत म्हणाले कि, बांदा शहराचे विस्तारिकरण हे झपाट्याने होत आहे. शहरात औद्योगिक तसेच वाणिज्य संकुले ही मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत. त्यामुळे साहजिकच विजेच्या मागणीत देखील वाढ होत आहे. शहराला इन्सुली वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. येथूनच सावंतवाडी तालुक्यातील बहुतांश गावांना वीज पुरवठा होता. बांदा शहराची वीज मागणी ही वाढतीच असल्याने परिणामी कमी दाबाने वीज पुरवठा होतो. यामुळे शहर वासियांना विविध वीज विषयक समस्याना सामोरे जावे लागते.
आठवड्यात मंगळवार हा महावितरणचा देखभाल दुरुस्ती दिवस असल्याने दिवसभर शहरातील वीज पुरवठा हा खंडित करण्यात येतो. त्यामुळे बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारावे तसेच यासाठी लवकरात लवकर सर्व्हे करून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.
फोटो:-
राजाराम सावंत.
