आचरा परीसराला पाऊस आणि विजेचा तडाखा…!

⚡मालवण ता.१८-: आचरा परीसराला काल रात्री विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे भात नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले. तर त्रिंबक येथील विवेक नंदकुमार त्रिंबककर यांच्या दुकानावर वीज पडून इमारतीसह विद्यूत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. तसेच वीज वितरण विभागालाही फटका बसला आहे.

काल गुरुवारी रात्री आचरा व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. पावसासोबत होणाऱ्या विजांच्या कडकडाटाने ग्रामस्थांच्या उरात धडकी भरवली. सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्रिंबक येथील विवेक नंदकुमार त्रिंबककर यांच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या सागाच्या झाडालगत वीज कोसळली. या वीजेची तिव्रता येवढी होती की जमिनीला खड्डा पाडत वीज दुकानाच्या इमारतीच्या भिंतीतून आत गेली. यात विद्यूत मिटर वायरींग जळून त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही छिद्र पडून दुकानाच्या पत्र्यांनाही तडे गेले होते. तर वीजेच्या कडकडाटाने आचरा येथेही आचरा तिठा ते देवगड रोड लगतच्या रहिवाशांच्या घरातील, दुकानातील इलेक्ट्रीक उपकरणे, इन्व्हर्टर जळून मोठे नुकसान झाले.

मुसळधार पाऊस व विजेचा फटका विद्यूत मंडळालाही बसला. यामुळे आचरा पंचक्रोशीचा वीज पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्यूत मंडळाचे सहायक अभियंता अनिल मठकर आणि विद्यूत कर्मचारी कसोशिने प्रयत्न करत होते.

गेले दोन तीन दिवस रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस पडत असल्याने हाता तोंडाशी आलेली शेती धोक्यात आली आहे. यात भात नाचणी शेतीसह झोडून ठेवलेला भाताचा सरला भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

You cannot copy content of this page