गटशिक्षणाधिकारी संजय माने:सुंदर शाळा उपक्रमात यश मिळविलेल्या टोपीवाला हायस्कुलमध्ये आनंदोत्सव साजरा..
मालवण (प्रतिनिधी)
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात टोपीवाला हायस्कुलने मिळविलेले यश हे शाळेने उपलब्ध केलेल्या भौतिक सुविधांमुळे तसेच संस्था चालकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि शिक्षकांची मेहनत यामुळे प्राप्त झाले आहे. आधुनिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन समाज घडविण्याचे काम शाळेने करावे, टोपीवाला हायस्कुलने मिळविलेले हे यश टिकवून प्रगती करत राहावी असे प्रतिपादन मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी येथे बोलताना केले.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रशालेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रशालेच्या गुरुवर्य श्री. जयवंत भगवान बिरमोळे रंगमंचावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शारदा मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी संजय माने, मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष दिगंबर सामंत, सचिव विजय कामत, स्कुल कमिटी अध्यक्ष दत्तप्रसाद खानोलकर, केंद्रप्रमुख शिवराज सावंत व राजेंद्र परब, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष जान्हवी चव्हाण, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रघुनाथ शेवडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी शिक्षक श्री. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्यासह केंद्रप्रमुख शिवराज सावंत व राजेंद्र परब यांचा दिगंबर सामंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या यशात योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक श्री. वळंजू यांच्या हस्ते श्रेयस्मृति मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने म्हणाले, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या टोपवीला हायस्कुलला रु. ३ लाख तसेच चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे, आचार संहिता संपल्यावर विशेष कार्यक्रमात टोपीवाला हायस्कुलला पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, टोपीवाला हायस्कुलने यापुढील टप्प्यात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवावा, असेही ते म्हणाले.
यावेळी केंद्रप्रमुख शिवराज सावंत व राजेंद्र परब यांनीही विचार मांडत शाळेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, शिक्षक देविदास वेरलकर यांनीही विचार मांडले. यावेळी दिगंबर सामंत अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले, टोपीवाला हायस्कुलने आज मिळविलेले यश हे संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक वर्गाची मेहनत यांच्यामुळे प्राप्त झाले आहे. मात्र या यशाने समाधानी न राहता पुढचा टप्पा कसा गाठायचा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश धामापूरकर यांनी केले. सरस्वती गीत व पसायदान सौ. तांबे यांनी सादर केले. तर विद्यार्थिनींनी यक्षगान नृत्य सादर केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व हितचिंतक उपास्थित होते.
