⚡मालवण ता.०८-: बामसेफ बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनी ९ ऑक्टोबर रोजी धारावी मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने “कही हम भूल ना जाये” अभियानांतर्गत आरक्षण बचाव.. बहुजन बचाव आणि संविधान जनजागरण रॅलीचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने दि. ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत नागपूरच्या दीक्षाभूमीहून “दीक्षाभूमी ते चैत्यभूमी” अशी संविधान जागरण रॅली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड सुनील डोंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. बसपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथील तथागत बुद्धांना व बाबासाहेबांना वंदन करून या रॅलीची सुरुवात झाली आहे.ही रॅली महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात फिरत-फिरत ९ ऑक्टोबर रोजी कांशीरामजींच्या परिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर पोहोचून तिथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर बसपाचे केंद्रीय नेते व महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनात धारावी मुंबई येथे रॅलीचा समारोप होणार आहे.
भारतीय संविधान व फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या बसपाची भूमिका तसेच बहुजन विरोधी व संविधान विरोधी काँग्रेस-भाजपची भूमिका समजावून सांगण्याचे कार्य करतील. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बसपा कार्यकर्ते समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बसपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. पी. के. चौकेकर यांनी केले आहे.
