कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका अपयशी ; उमेश चव्हाण यांची टीका..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना वाढत असून काही दिवसांपूर्वी देऊळवाडा भागातील एका महिलेचा कुत्र्याने चावा घेतल्यावर काल त्याच महिलेच्या लहान मुलाच्या पायाचा चावा कुत्र्याने घेतल्याने यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, मालवणातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची समस्या गेले काही वर्षे जैसे थे असून नगरपालिकेकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, नगरपालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका ठाकरे शिवसेना युवासेनेचे मालवण उपशहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी करत कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले वाढत असल्याने नागरपालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
मालवण शहरात गेल्या काही वर्षापासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शहरातील रस्ते, गल्ली बोळ, वाडीवाडीत कुत्र्यांचा संचार वाढला आहे. रस्त्यावर कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये – जा करावी लागत आहे. कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनाही वाढत आहेत. नगरपालिकेने काही वर्षापूर्वी शहरातील कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुत्रे निर्बीजीकरण मोहीम राबवली होती. मात्र या मोहिमेत कोणतेही सातत्य ठेवण्यात आलेले नाही. यामुळे मालवण शहरातील कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. देऊळवाडा भागातही कुत्र्यांचा संचार वाढला असून काही दिवसापूर्वी एका महिलेवर कुत्र्याने हल्ला चढवत चावा घेतल्याची घटना घडली होती. या घटनेने या परिसरात घबराट पसरली असतानाच त्याच महिलेच्या लहान मुलाच्या पायाचा कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
मालवण शहरात कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवत तसेच नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. नागरिकांवर कुत्र्यांकडून जीवघेणे हल्ले होत असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे, अशी टीका युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी केली आहे.
