संदीप बांदेकर:मुलांची मापे चुकल्याने गणवेश वाटपात उशीर होत असल्याची दिली माहिती..
बांदा/प्रतिनिधी
बांदा निमजगा प्राथमिक शाळेतील गणवेशाचा विषय हा मुलांची मापे व्यवस्थित न घेतलेल्या चुकीमुळे घडलेला आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही सुरु आहे. सदर विषयात शाळा आणि व्यवस्थापन समिती स्वतः लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे नाहक कोणीही काम पूर्णत्वास येत असताना यामध्ये खो घालण्याचे काम करू नये असा सल्ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी पत्रकातून दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी गणवेश येत्या आठ दिवसात न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याला श्री बांदेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यांनी म्हटले कि, ज्ञानदानाच्या पवित्र मंदिराचा वापर राजकारणासाठी न करता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शाळेचा विकास करायला हवा. शाळेची शैक्षणिक प्रगती योग्य रीतीने होत असताना शाळेविरुद्ध बदनामीकारक कोणतेही आरोप यापुढे सहन केले जाणार नाहीत. मुलांना गणवेश देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
