महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारीने मारली बाजी..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या संजय मांडे यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी ठाण्याच्या जाहिद एहमद फारुकी यांचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला, तर महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारी हिने ठाण्याच्या मधुरा देवळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावले. आज सायंकाळी उशिरा हे दोन्ही अंतिम फेरीचे सामने झाले. या स्पर्धेत पुरुष गटात 148 तर महिला गटातून 32 स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने सिंधुदुर्ग डिस्टिक कॅरम असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ट सिंधुदुर्ग यांनी या पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धेचं आयोजन केलं होते.
तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन, भाजप क्रीडा प्रकोष्ट आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धा गेले तीन दिवस येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडली. सोमवारी रात्री स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
या स्पर्धेमध्ये महिला एकेरीत प्रथम काजल कुमारी मुंबई, द्वितीय मधुरा देवळे ठाणे, तृतीय रिंकी कुमारी मुंबई, चतुर्थ समृद्धी घाडीगावकर ठाणे, पाचवी दीक्षा चव्हाण सिंधुदुर्ग, सहावी आकांक्षा कदम रत्नागिरी, सातवी प्राजक्ता नारायणकर मुंबई, आणि आठवी केशर निर्गुण सिंधुदुर्ग. तर पुरुष एकेरीत प्रथम संजय मांडे मुंबई, द्वितीय इजाज फारुखी ठाणे, तृतीय सागर वाघमारे पुणे, चतुर्थ पंकज पवार मुंबई, पाचवा विकास धारिया मुंबई,सहावा महंमद फरान मुंबई, सातवा योगेश परदेशी पुणे, आठवा प्रकाश गायकवाड पुणे.
पुरुष गटातील अंतिम सामना संजय मांडे मुंबई आणि एजाज फारुकी ठाणे यांच्यात तब्बल अडीच तास रंगला. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या सामना साडेसातला संपला. हा सामना अटीतटीचा झाला. अखेर संजय मांडे यांनी पालकमंत्री चषकावर नाव कोरले. अंतिम सामन्याचे तीन गेम झाले. आठ बोर्ड मध्ये टाय झाल्यानंतर नववा बोर्ड खेळावा लागला. यात 58 वर्षीय श्री मांडे यांनी यांनी 16 -6, 0-25, 22-18 अशी बाजी मारली. महिला फायनल मध्ये काजल कुमारीने 25-5 आणि 25-8 अशी मधुरा देवळेकर सहज मात केली.
प्रभाकर सावंत यांनी कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडूंना धन्यवाद दिले. अरुण केदार यांनी एका बाजूला कॅरम मध्ये महिलांची तरुण पिढी तयार होते तर दुसरीकडे पन्नाशीच्या वरचे खेळाडू आहेत असे सांगत त्यांचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग कॅरॅम असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुधीर भणगे, कुडाळ कमशीप्र मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद शिरसाठ अमोल खानोलकर, शुक्राचार्य महाडेश्वर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर, आशिष बागकर, बंड्या सावंत, सुनील धुरी, श्री. वाडकर, सुनील बांदेकर, श्री. परब उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश फणसळकर यांनी केले.
