महिला जळीत प्रकरणी सुशांत गोवेकर याला ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथे सौ. सौभाग्यश्वरी गोवेकर (पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर) या महिलेवर पेट्रोल ओतून लाईटरने पेटवून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला प्रीती हिचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर याला आज मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्याला दि. ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालवण बसस्थानकासमोरील के जी डायगनोस्टिक सेंटर या लॅब मध्ये काम करणाऱ्या सौभाग्यश्वरी सुशांत गोवेकर तथा पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर हिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला लाईटरणे पेटवून दिल्यानंतर या घटनेत गंभीर रित्या जळालेल्या प्रीती हिचा बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता. तर प्रीती हिला मृत्युच्या दाढेत लोटणाऱ्या तिचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर (वय ४०, रा. धुरीवाडा मालवण) या फरारी आरोपीला १५ ते १६ तासाच्या आत काल गुरुवारी सकाळी मालवण पोलीसांनी कुंभारमाठ येथून ताब्यात घेतले. त्यानंतर सुशांत याला अटक करण्यात आली. या प्रकरणी मयत प्रीती हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार मालवण पोलीसांकडून सुशांत गोवेकर याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यासाठी बीएनएस १०३ (वाढीव), १०९, १२४ (A), ११७ (C), ११८ (२) या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी सुशांत गोवेकर याला मालवण पोलिसांनी मालवण न्यायालयात हजर केले. सदर गुन्ह्यात अधिक तपास करावयाचा असून आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन व कपडे व अन्य साहित्य ताब्यात घेणे, गुन्हा केल्यानंतर आरोपी हा ज्या ज्या ठिकाणी गेला त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास करणे, गुन्ह्यात आणखी कोण सहभागी होते हे शोधणे या तपासकामासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी न्यायालयाकडे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. याबाबत न्यायालयाने आरोपी सुशांत गोवेकर याला दि. ४ ऑक्टोबर पर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

You cannot copy content of this page