⚡मालवण ता.२५-: मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाने १९६५ साली स्थापन केलेल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला जून २०२५ मध्ये ६० वर्षे पूर्ण होत असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधी मध्ये विविध उपक्रम आयोजित होणार आहेत. हीरक महोत्सव आणि पर्यटन दिना निमित्त महाविद्यालयातर्फे साजरा होणारा पर्यटन सप्ताह या दोन्ही कार्यक्रमांचा शुभारंभ दि. २७ सप्टेंबर रोजी होणार असून पर्यटन सप्ताहानिमित्त २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ‘लोककला पर्यटन’ अशी या पर्यटन सप्ताहाची संकल्पना आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर आणि प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर व प्रा. डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होत्या. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा मेळ साधून जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा, धोरणात्मक योगदान देता यावे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग महाविद्यालय सन २०२१-२२ पासून पर्यटन सप्ताह साजरा करीत आहे. यंदाचे हे चौथे वर्ष “लोककला पर्यटन” या संकल्पनेवर आधारित असून, हा पर्यटन सप्ताह दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि युवा टुरिझम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. महाविद्यालयाचे हिरक महोत्सवी वर्ष आणि पर्यटन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील नरहरी झांट्ये सभागृहात मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले- सावंत, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर व सर्व पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. समीर गवाणकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककला कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती यावेळी प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी दिली.
या पर्यटन सप्ताहात २८ सप्टेंबर रोजी विद्यार्थी परिसंवादामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककला आणि पर्यटन यांची सांगड घालून विद्यार्थी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. २९ रोजी याच संकल्पनेवर आधारित ऑनलाईन प्रश्न मंजुषा, ३० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतार कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांची मुलाखत, तर १ ऑक्टोबर रोजी दशावतार आणि पर्यटन यातील परस्परपूरकता या विषयावर दशावतार अभ्यासक डॉ. विजय फातर्फेकर यांचे व्याख्यान होणार आहे. ठाकर समाजाच्या चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, इत्यादी लोककला समजून घेण्यासाठी कुडाळ, पिंगुळी येथील ठाकरवाडी आणि कलांगण या लोककला दालनांना २ ऑक्टोबर रोजी कॉलेजचे विद्यार्थी आणि स्टाफ भेट देणार आहेत. तसेच जिल्ह्यातील फुगडी या महिलांच्या लोककलेचे संवर्धन करण्यासाठी कॉलेजमध्ये ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. फुगडी संमेलन आयोजित केले आहे. तसेच महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवातनिमित्त फेब्रुवारी २०२५ विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये निबंध स्पर्धा, कवी संमेलन, शोभायात्रा, माजी विद्यार्थी मेळावा, आणि सांगता समारंभ यांचा समावेश आहे. पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला आणि पर्यटन” या विषयावर ISBN नंबर असलेले पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. या पुस्तकासाठी लेख आणि शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन यावेळी प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.
पर्यटन सप्ताहाचे उद्घाटन व इतर कार्यक्रम, तसेच हिरक महोत्सवातील पुढील कार्यक्रमांमध्ये मालवणवासीय, सर्व आजी माजी विद्यार्थी, पर्यटन व्यवसायिक, पर्यटनातील अभ्यासक, सामाजिक संस्था, सर्व लोककलेतील कलाकार मंडळी, संबंधित संस्था यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.ठाकुर यांनी यावेळी केले.
