जयेंद्र परुळेकर: पंधरा वर्षात मतदारसंघासाठी काय केले? किती रोजगार निर्माण केले..?
⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची खैरात करतात, मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा धंदा झाला असा टोला ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज केला लगावला.दरम्यान आतापर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काय केले? किती रोजगार निर्माण केले? जनतेच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी काय केलं? असा सवाल श्री परुळेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
याबाबत त्यांनी निवेदन दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की
गेली पंधरा वर्षे या मतदारसंघातील जनतेने त्यांना सातत्याने विधीमंडळात पाठवले पण गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक विकास केला, मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं आहे.
मतदारसंघातील जनता त्यांची आता खिल्ली उडवत आहे, चष्मा, सेटटाॅप बाॅक्स,चांदा ते बांदा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आता आडाळी एम आय डी सी, जर्मनीत नोकऱ्या हे विनोदाचे विषय झालेले आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.दरम्यानआंबोली चौकूळ कबुलायतदार हा विषय च्यूईंग गम प्रमाणे दर निवडणुकीत ते चघळताना दिसतात, निवडणुका पार पडल्या की त्या विषयावर पडदा पडतो अशी टीका त्यांनी यावेळी केली.
