ओरोस ता २३
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेमार्फत शनिवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. २०२४ या वर्षातील तिसरे लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक न्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी केले आहे.
लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही, वैराने वैर वाढतच राहते असे होऊ नये यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपिल होत नाही, वेळ व पैशांची बचत होते. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
