सतीश सावंत यांचा आरोप: कणकवली मतदारसंघातील बेंचेसमध्ये दीड कोटींचा भ्रष्टाचार…
⚡कणकवली ता.२३-: येथील मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये दोन हजार बेंचेस बसविण्यात आल्या. या बेंचेसच्या अडीच कोटींच्या कामामध्ये तब्बल दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. आमदार नितेश राणे आणि समाजकल्याण विभाग यांच्या संगनमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या निधीचा असा दुरूपयोग झाल्याचा आरोप शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज केला. येथील विजयभवन येथे श्री.सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यासोबत शिवसेना ठाकरे पक्ष जिल्हा महिला संघटक नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उत्तम लोके, तेजस राणे आदी उपस्थित होते. श्री.सावंत म्हणाले, मागासवर्गीय वस्तीमध्ये बेंचेस बसविण्याबाबत कुठल्याही ग्रामपंचायतीकडून मागणी आली नव्हती. मात्र निव्वळ भ्रष्टाचार करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी समाजकल्याण विभागातील आयुक्त, उपायुक्त यांच्या संगनमताने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या बेंचेस बसविण्याचा घाट घातला. सध्या बसविण्यात आलेल्या या लोखंडी बेंचेसची किंमत बाजारभावानुसार ३ हजार रुपये आहे. तर कागदोपत्री त्याची किंमत १२ हजार ५०० रुपये दाखविण्यात आली आहे. एका बेंचेस मागे तब्बल नऊ हजार रुपयांचा आणि एकूण दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. श्री.सावंत म्हणाले, भाजप सरकारने ज्याप्रमाणे राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. त्याच धर्तीवर बेंचेस बसविण्यामध्येही आमदार नितेश राणे यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाला आहे. शासकीय योजनांच्या कामात भ्रष्टाचार करायचा आणि हा पैसा निवडणुकांमध्ये वापरून निवडणूका जिंकायचा असा फंडा नितेश राणे आणि भाजपकडून वापरला जात आहे. सावंत म्हणाले, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये बसविण्यासाठी ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या बेंचेस ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून देण्यात आलेल्या आहेत. या बेंचेसवर त्या योजनेचे नाव असायला हवे. पण हे नाव खोडून तेथे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून असे लिहिण्यात आले आहे. राष्ट्रपुरूषांचे नाव खोडून तेथे आपले नाव लिहिण्याचा या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी आम्ही ३० सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात सर्व संघटनांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री.सावंत यांनी केले.
