आम्हाला आरक्षण नको इडब्लूएस द्या…

ऍड. सुहास सावंत:भूमिका समजावून सांगण्यासाठी जिल्हाभर मेळावे घेणार,पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद नाही त्यामुळे उर्वरित महाराष्ट आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी भागाचा विचार करता येथील मराठयांना आरक्षण नको इडब्लूएस द्या अशी मागणी अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच मेळावे घेऊन हि भूमिका मराठा समजला समजावून सांगितली जाईल असे ऍड. सावंत यांनी सांगितले. ते कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. .
कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला अमरसेन सावंत, शिवाजी घोगळे, मुकुंद धुरी, लक्ष्मण पावसकर, लवू गावडे, हर्षद पालव, श्रीधर गावडे, सुहास सावंत, श्री चव्हाण, मिलिंद मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऍड. सुहास सावंत म्हणाले, मराठा समाजाचे मेळावे घेऊन आमचे उद्दिष्ट साध्य होणार नाही तर लोकांचे प्रबोधन पण होणे आवश्यक आहे. २०१६ ला आम्ही मराठा क्रांती मोर्चा काढला. त्याला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनतर दोनवेळा मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पहिले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. १५ फेब्रुवारी २०२४ ला जे दुसरे आरक्षण दिले आहे ते सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. आज या पार्श्वभूमीवर विविध मागण्या विविध समाज घटकांकडून येत आहेत. दुसरीकडे संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाचे स्फूर्तिस्थान प्रज्वलित करण्याचा प्रत्यन केला आहे. त्यांच्या आंदोलकांकडे कोकणातील मराठा म्हणून जर बघायचे झाले तर त्यांनी जी सुरवातीला सरसकट मराठा हि भूमिका घेतली होती ती आम्हाला मान्य होती. कारण ती कायदेशीर दृष्ट्या योग्य होती. कारण सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा मराठा समाजाला आरक्षण नाकारले तेव्हा मराठा समाज हा प्रगत समाज आहे. असे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे मराठा या नावाने जर पुन्हा आरक्षण मागितले गेले तर ते कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही. म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची अखिल भारतीय मराठा महासंघाने भूमिका घेतली. सर्वच लोकांचा त्या भूमिकेला पाठिंबा होता असे नाही. असे ऍड. सावंत म्हणाले.
त्यांनतर जरांगे पाटील यांनी सगेसोयरे याना देखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली. या भूमिकेला सुद्धा आमचा काही विऱोध नाही असे ऍड. सावन्त यांनी सांगितले. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जुन्या काळापासून मोठ्या प्रमाणात कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार झालेले आहेत. पंजाबराव देशमुख यांनी मोठया प्रमाणात जनजागृती केली त्यामुळे विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मराठ्यांनी आपल्या जातीची नोंद कुणबी अशी केली. त्यामुळे रोटी-बेटी व्यवहार करताना कुणबी किंवा मराठा असे काही बघितले जात नव्हते. त्यातूनच सगेसोयरेचा उगम झाला. मराठा-कुणबी विवाहाची बोलणी ठरवताना ते सगे असतात आणि लग्न झाले ते सोयरे होतात. त्यामुळे सगेसोयरे हा शब्द आला आहे आणि तो त्या भागामध्ये चपखल बसतो. त्या मागणीला आमचा सुद्धा विरोध नाही, असे ऍड. सावंत यांनी सांगितले.
ऍड. सावंत पुढे म्हणाले, अनेक न्यायायलीन निवाडे, अनेक राज्य मागास आयोगाचे अहवाल यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत यावर एकमत नाही. खत्री आयोगाने फरक असल्याचे म्हटले आहे, तर गायकवाड आयोगाने मराठा आणि कुणबी एकच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयोगामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे या पार्श्वभूमीवर आता शासनाकडून गॅझेटियरच्या नोंदींच्या आधारे जातीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे हैद्राबाद गॅझेटियर,याची नोंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातले मराठे हे कुणबी समाजात जाणार आहेत. सातारा गॅझेटियरनुसार पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग हा कुणबी मध्ये जाणार हाये. बॉम्बे रेसिडेन्सी गॅझेटियरमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी भाग येत असला तरी या गॅझेटियरमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या नोंदी नाहीत. त्यामुळे जर उद्या सरकारने बॉम्बे गॅझेटियर, हैद्राबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर लागू केले तर त्याचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील मराठ्यांना होणार नाही, असे ऍड. सावंत यांनी स्पष्ट केले.
अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने काहीतरी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील मराठ्यांचे नेमके हित काय आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. अशा परिस्थतीत आमच्या अभ्यासानुसार विदर्भातील मराठे कुणबी आहेत, हैद्राबाद गॅझेटियर लागू झाले तर मराठवाड्यातील मराठे कुणबी आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील ४० टक्के पेक्षा जास्त मराठ्यांनी आजच कुणबीचे दाखले घेतले आहेत. बॉम्बे गॅझेटियरचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील मराठ्यांना होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील मराठा समाज हा आता कुणबी होण्याची शक्यता आहे. परंतु अशा प्रकारच्या कागदोपत्री नोंदी या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागातील मराठ्यांच्या नाहीत. येथील नोंदी या मराठा म्हणूनच सापडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे मराठा समाज म्हणून आरक्षण मिळणार नाही आणि मिळाले तरी ते फारसे टिकणार नाही, असेदेखील ऍड. सावंत आईनी स्पष्ट केले.
अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मधील मराठा बांधवांचे काय होणार असा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला गावोगावी मेळावे घेऊन हि वस्तुस्थिती मराठा समाजासमोर मांडायची आहे, मनोज जरांगे हेच आमचे मराठा समाजाचे नेते राहतील. जरांगेच्या सगळ्या मागण्यांना आमचा पाठिंबा राहील. परंतु मराठा म्हणूनच जर आमची कागदोपत्री गणना होणार असेल सिंधुदुर्ग रत्नागिरीतील मराठ्यांना आरक्षणच नको आम्हाला इडब्लूएस द्या अशी मागणी ऍड. सुहास सावंत यांनी केली आहे. कारण ज्यांना आरक्षण मिळेल ते कुणबी होतील आणि ते ओबीसी मध्ये जातील. त्यांना ओबीसींच्या १९ टक्के प्रमाणे आरक्षण मिळेल. आमच्यासाठी १० टक्के इडब्लूएस आरक्षण मिळाले तरी आमचे त्यात नुकसान नाही. अशा प्रकारे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागू शकेल असा विश्वास यावेळी ऍड. सुहास सावंत यांनी व्यक्त केला.
अशा प्रकारचे प्रबोधन करण्यासाठी आम्ही नवरात्रीनंतर मराठा समाजाचे मेळावे घेणार आहोत. त्याची सुरुवात कुडाळ पासून करणार आहोत. लोकांचे जनमत तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी असे मेळावे घेणार असल्याचे देखील ऍड. सुहास सावंत यांनी शेवटी सांगितले.

You cannot copy content of this page