वराडकर, कुशे यांचा आरोप खोडसाळ…

नीलेश राणेंनी केलेली भाषा योग्य नाही;माजी सभापती पूनम खोत यांची प्रसिद्धि पत्रकातुन उत्तर

मालवण (प्रतिनिधी) मालवण भाजीमार्केट मधील जे सात गाळे पाडण्यात आले त्यातील रीतसर करारनामा असलेला माझाही गाळा नगरपालिकेकडून पाडण्यात आला. त्यानंतर आम्ही मार्केट लगत काही वर्षापूर्वी नव्याने बांधलेला गाळा नगरपालिकेच्या परवानगीने भाडे तत्वावर घेऊन सर्व रीतसरपणे आमचा बिअर शॉपीचा व्यवसाय सुरू केला. असे असताना केवळ राजकीय द्वेषापोटी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी खोत कुटुंबियांचा गाळा पाडला नाही असा आरोप करत उपोषणाचा दिखावा करून खोत कुटुंबाची बदनामी केली. या उपोषणास माजी खासदार निलेश राणे यांनी पाठिंबा देत बुलडोझरने गाळा पाडण्याची भाषा केली हे योग्य नाही. कुशे व वराडकर यांनी केलेले आरोप खोडसाळ व जनतेची दिशाभूल करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया मालवणच्या माजी सभापती आणि ज्येष्ठ व्यापारी सौ. पूनम परशुराम खोत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, खोत कुटुंबाची नाहक बदनामी केल्याप्रकरणी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल करून प्रसंगी न्यायालयीन मार्गाने दाद मागितली जाईल, असा इशाराही पूनम खोत यांनी दिला आहे. पूनम खोत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे, आम्हाला राजकारणात स्वारस्य नाही असे सांगत अधिकृत व्यावसायिक म्हणून आमची बाजू मांडत असल्याचे पूनम खोत यांनी म्हटले आहे. मालवण नगरपालिकेने जे भाजी मार्केट धोकादायक म्हणून पाडले त्या भाजी मार्केटमध्ये माझाही गाळा होता. हा गाळा मी २०१५ साली नगरपालिकेकडून रीतसर करारनामा करून भाडेतत्त्वावर घेतला होता. त्याठिकाणी सर्व परवानग्या घेऊन बियर शॉपी व्यवसाय सुरू होता. नगरपालिकेने भाजी मार्केट इमारत पाडण्याची कार्यवाही केल्यानंतर इतर गाळ्यांप्रमाणे आमचाही गाळा पाडण्यात आला. आमच्याकडे करारनामा असताना अचानक गाळा पाडण्यात आल्याने आमच्या व्यवसायासाठी असलेल्या परवान्याचे मोठे नुकसान झाले. नगरपालिकेकडे पर्यायी व्यवस्थेची मागणी आम्ही केली, मात्र बियरशॉपीसाठी असलेल्या सर्व निकषात बसणाऱ्या जागेची व्यवस्था नगरपालिकेकडून करण्यात आली नाही. चार ते पाच महिने व्यवसाय बंद राहिल्याने आमचे मोठे नुकसान होत असल्याने आम्ही व्यवसायासाठी पर्यायी जागेची व्यवस्था शोधत होतो. त्यादरम्यान, भाजी मार्केटलगत काही वर्षांपूर्वी नव्याने बांधकाम झालेला एक गाळा पालिकेने भाडे तत्वावर दिला असताना कोरोना काळ असल्याने तो बंद होता. तो गाळा मिळण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. गाळेधारक सुहास वारंग यांच्याशी संपर्क साधून तुमचा गाळा आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात व्यवसायासाठी मिळेल का अशी विचारणा केली. त्यावेळी वारंग यांनी सांगितले, सद्यस्थितीत कोरोनामुळे मलाही या गाळ्यात व्यवसाय करणे शक्य होत नाही. तरीही हा गाळा भाडेतत्त्वावर द्यायचा की नाही याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे विचारणा करून कळवतो, असे सांगितले. त्यादृष्टीने त्यांनी नगरपालिकेकडे अर्ज केला, व करारावर घेतलेला गाळा अन्य व्यावसायिकाला तात्पुरत्या स्वरूपात पोटभाडेकरू स्वरूपात देण्याबाबत वारंग यांनी केलेल्या मागणीनुसार नगरपालिकेने सर्व पूर्तता करून आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्यास रीतसर परवानगी दिली. त्यानुसार गाळेधारक व नगरपालिका प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क यांच्या परवानगीने सुहास वारंग यांच्या गाळ्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला आहे. असे असताना वराडकर व कुशे यांनी नगरपालिकेसमोर उपोषणास बसून गाळा पाडून टाकण्याची भूमिका घेत आमची बदनामी केली. नीलेश राणे यांच्या सारख्या माजी खासदार राहिलेल्या जबाबदार व्यक्तीला खोटी व दिशाभूल करणारी माहिती कुशे, वराडकर देतात. आम्ही राणे कुटुंबासोबत राजकीय प्रवास केला, त्याच कुटुंबातील निलेश राणे आमच्याबद्दल कोणतीही माहिती न घेता कुशे- वराडकर यांच्या खोट्या माहितीच्या आधारावर उपोषणाला पाठिंबा देतात हे चुकीचे आहे. गाळा आमचा असल्याचे सांगत गाळा बुलडोझरने पाडण्याची भाषा निलेश राणे करतात हेही योग्य नाही, असे पूनम खोत यांनी म्हटले आहे. विस्थापित झालेला एक गाळेधारक या नात्याने आमचा न्याय पद्धतीने नगपालिकेने विचार करावा. मालवण नगरपालिकेत सुरू असलेल्या सूड बुद्धीच्या राजकारणाला आमच्यासारख्या ज्येष्ठ व्यावसायिकावर अन्याय होणार नाही व आमची बदनामी होणार नाही, याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने घ्यावी, अन्यथा न्याय मिळवण्याचे सर्व मार्ग आमच्याकडे खुले आहेत, असा सूचक इशारा पूनम खोत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page